फुटपाथ दुकानदारांनी काढले अतिक्रमण
By admin | Published: January 7, 2017 01:23 AM2017-01-07T01:23:13+5:302017-01-07T01:23:13+5:30
गडचिरोली शहरातून जाणाऱ्या चार राष्ट्रीय महामार्गाच्या लगत इंदिरा गांधी चौकात असलेले
पालिकेची धडक मोहीम सुरू : राष्ट्रीय महामार्गालगत इंदिरा गांधी चौकात कारवाई प्रारंभ होताच
गडचिरोली : गडचिरोली शहरातून जाणाऱ्या चार राष्ट्रीय महामार्गाच्या लगत इंदिरा गांधी चौकात असलेले फुटपाथ व्यावसायिकांचे अतिक्रमण शुक्रवारी नगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने चोख पोलीस बंदोबस्तात काढण्यास सुरूवात करताच चारही मार्गावरील व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण काढून टाकण्यास स्वत: सुरूवात केली. इंदिरा गांधी चौकातून या मोहिमेला प्रारंभ झाला.
चंद्रपूर, धानोरा, आरमोरी व चामोर्शी या चारही मार्गावरील सर्व दुकानांचे अतिक्रमण काढण्याबाबत ३० डिसेंबर रोजी ४०० दुकानदारांना नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी ६ जानेवारीला नगर पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांच्या नेतृत्वात अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला सुरूवात करण्यात आली. यावेळी ५० वर अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. जेसीबीच्या सहाय्याने अनेक दुकानांचे कच्चे अतिक्रमण काढून टाकण्यात आले. त्यामुळे मोटवानी कॉम्प्लेक्स पुढचा भाग मोकळा झाला आहे. तसेच दूरसंचार कार्यालयाच्या संरक्षक भिंतीला लागून असलेले सर्व दुकानांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. त्यानंतर अनेक दुकानदारांनी दिवसभर आपले दुकान बंद ठेवून येथील सामान हलवित असल्याचे दिसून येत होते. ३० डिसेंबर रोजी शहरातून जाणाऱ्या चारही राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पार पडल्यानंतर आता अतिक्रमण हटविण्यात आल्याने या रस्ता व नाली बांधकामाला लवकरच सुरूवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अतिक्रमण हटवित असताना कोणतीही अनुचित घटना घडली नाही. चंद्रपूर मार्गावरील राहूल मशनरीज समोर अतिक्रमण हटवित असताना काही नागरिक जेसीबीच्या समोर उभे ठाकले होते. त्यांना पोलिसांनी बाजुला करून येथील अतिक्रमण हटविले. या पथकात विभाग प्रमुख अभियंते सुरज पुनवटकर, अभियंते गिरीष मैंद, उमेश शेंडे, सुरेश भांडेकर, शरद सोनटक्के, आर. पी. गिरोले, नितेश सोनवाने व इतर कर्मचारी हजर होते. (प्रतिनिधी)