बहिणीच्या वरातीआधीच निघाली भावाची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:11 AM2019-03-31T00:11:04+5:302019-03-31T00:11:26+5:30
कुटुंबात एखाद्याचे लग्न असले की संपूर्ण कुटुंब आनंदात न्हाऊन निघते. बहिणीचे लग्न असल्यास भावाच्या उत्साहाला पारावार राहात नाही. मात्र कोकडी येथील गुरूदेव उमाजी टिकले (२५) हा भाऊ या बाबतीत अभागी ठरला. लहान बहिणीचे लग्न केवळ एक दिवसावर असताना गुरूदेवची प्राणज्योत मावळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा/तुळशी : कुटुंबात एखाद्याचे लग्न असले की संपूर्ण कुटुंब आनंदात न्हाऊन निघते. बहिणीचे लग्न असल्यास भावाच्या उत्साहाला पारावार राहात नाही. मात्र कोकडी येथील गुरूदेव उमाजी टिकले (२५) हा भाऊ या बाबतीत अभागी ठरला. लहान बहिणीचे लग्न केवळ एक दिवसावर असताना गुरूदेवची प्राणज्योत मावळली. ज्या अंगणातून रविवारी बहिणीची डोली निघणार होती, त्याच अंगणातून गुरूदेवची अंत्ययात्रा काढण्याचा दुर्दैवी प्रसंग टिकले परिवारावर ओढवला. ही घटना शनिवारी (३०) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
गुरूदेवच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने तो मागील तीन वर्षांपासून मृत्यूशी झुंज देत होता. कौटुंबिक जबाबदारी व आरोग्याशी लढत त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्याच्या कुटुंबाने पै-पै जमा करून डायलेसिसवर गुरूदेवला जगविण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान ३१ मार्च रोजी त्याच्या लहान बहिणीचे लग्नकार्य होते. यामुळे गुरूदेवसह संपूर्ण कुटुंब आनंदात होते. आपल्या बहिणीचे हात पिवळे होताना बघण्याची आस गुरूदेवला होती. मात्र हे नियतीला कदाचित मान्य नसावे.
गुरूदेवचे वडील बालवयातच वारले. वडिलांच्या मृत्यूनंतर स्वत:चे शिक्षण व कुटुंबाचे पालनपोषण ही दुहेरी कसरत गुरूदेवने पार पाडली होती. त्यामुळे कमी वयातच तो कुटुंबाचा आधार बनला होता. गुरूदेवच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्याला स्वत:चे मरण जवळ असल्याचे माहित होते, मात्र बहिणीच्या लग्नापर्यंत आपण जगू, अशी आशा तो बाळगून होता.
गंभीर आजार असतानाही गुरूदेवचा आत्मविश्वास अजिबात कमी झाला नव्हता. त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. प्रत्येक महिन्याला आठ ते दहा वेळा डायलेसीस करावे लागत होते. त्याची आई, आजी, भाऊ, बहिण यांनी जीवाचे रान करून गुरूदेवला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. गुरूदेवचा जीवनसंघर्ष शनिवारी सकाळी संपला.
‘लोकमत’ने मिळवून दिली मदत
गुरूदेवची हलाखीची आर्थिक परिस्थिती व त्याच्या उपचारासाठी असलेली पैशाची गरज लक्षात घेऊन त्याला आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने लोकमतने २३ जानेवारी २०१८ रोजी बातमीही प्रकाशित केली होती. ‘उच्चशिक्षित गुरूदेवला उपचारासाठी गरीबी ठरतेय शाप’ या मथळ्याची बातमी प्रकाशित झाल्यानंतर काही दात्यांनी गुरूदेवला आर्थिक मदतही केली, मात्र ती मदत अपुरी ठरली.