सिंचनाचा दुष्काळ संपवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 11:59 PM2019-04-06T23:59:16+5:302019-04-06T23:59:44+5:30
गडचिरोली जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. सुमारे २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड केली जाते. मात्र जेमतेम २६ हजार हेक्टरवरच सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. सुमारे २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड केली जाते. मात्र जेमतेम २६ हजार हेक्टरवरच सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. एकूण शेत जमिनीच्या केवळ १० टक्के क्षेत्रावर सिंचन आहे. सिंचनाच्या सुविधा वाढविण्यासाठी आमच्याकडून अनेक वर्षांपासून मागणी होत असली तरी त्याकडे फारसे लक्ष दिले जात आहे. आता ३-४ वर्षात सिंचन विहीरी दिल्याने थोडा दिलासा मिळाला, अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिली.
उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. यामुळे संपूर्ण अर्थकारण शेतीवरच आधारित आहे. येथील वातावरण व जमीन धान पिकासाठी अनुकूल असल्याने धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे धान पिकाला अगदी सुरूवातीपासून तर शेवटपर्यंत पाणी द्यावे लागते. त्यामुळे हातची सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. परिणामी पावसाच्या भरवशावरच शेती केली जाते.
पावसाने दगा दिल्यास पीक करपताना बघावे लागते. बºयाचवेळा उत्पादन खर्चही निघत नाही. सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन निवडून येणाºया प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून दिले जाते. मात्र ज्या प्रमाणात सिंचनाचे क्षेत्र वाढायला पाहिजे ते वाढत नाही. आधुनिक तंत्रज्ञान व सुशिक्षित झालेला शेतकरी आपल्या शेतात अनेक प्रयोग करून शेती करू इच्छितो. पण सिंचनच उपलब्ध नसेल तर शेती करणार तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. गावात रस्ते, नाली बांधण्याऐवजी तोच निधी प्राधान्याने सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास येथील शेतकºयांची स्थिती सुधारण्यास मदत होईल.
जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. त्यावर बंधाऱ्यांचे बांधकाम होणे आवश्यक आहे. मात्र बंधारे बांधल्या गेले नाही. काही बंधाऱ्यांचे बांधकाम अपुरे आहे. तर काही बंधारे निकृष्ट दर्जाचे बांधल्याने ते पहिल्याच पाण्यात वाहून गेले आहेत. शेततळे हे केवळ शासनाचे सोंग आहे. उन्हाळयात शेततळ्यांमध्ये पाणी राहत नाही. कर्जमाफी हा तोडगा नाही तर सिंचन सुविधा हाच खरा उपाय आहे.
- जगन्नाथ बोरकुटे, जि. प. सदस्य.
आपले पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यामुळे कृषीमध्ये येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे सुमारे १५ एकर शेती आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करणे शक्य सुद्धा आहे. मात्र सिंचनाची सुविधा नाही. परिणामी सर्वच मार्ग बंद झाले आहेत. चिचडोह बॅरेजप्रमाणे इतरही नद्यांवर बंधारे झाल्यास बारमाही सिंचनाची सुविधा होईल. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
- दीपक धोटे, देसाईगंज