वैनगंगेत आंघोळीसाठी गेलेल्या अभियंता युवकाचा मृतदेहच लागला हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 03:50 PM2022-02-21T15:50:38+5:302022-02-21T17:17:18+5:30
दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अखेर सोमवारी त्याचा मृतदेहच डोर्ली घाटात आढळला.
आरमोरी(गडचिरोली) : घरातल्या पुजेतील फुले (निर्माल्य) विसर्जन करण्यासाठी वैनगंगा नदीवर गेलेला येथील अभियंता युवक आईसमोरच नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. दरम्यान, दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अखेर सोमवारी त्याचा मृतदेहच डोर्ली घाटात आढळला. अभिनव दौलत कुथे (२३) असे मृत युवकाचे नाव असून, तो येथील नवीन बस स्थानकासमोरील भागातील रहिवासी होता.
प्राप्त माहितीनुसार, अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या अभिनवला काही महिन्याआधीच पुण्यात नोकरी लागली होती. सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असल्याने आरमोरीत होता. रविवारी आईसोबत निर्माल्य विसर्जन करण्यासाठी वैनगंगा नदीपात्रात उतरला होता. त्यानंतर त्याने आईला सांगून आंघोळ करण्याची इच्छा व्यक्त केली. थोड्या वेळात तो आंघोळ करून परतला; पण पुन्हा आंघोळीसाठी नदीपात्राकडे गेला. यावेळी तो नदीपात्रात थोडा पलिकडे गेला. नदीप्रवाहाचा वेग जास्त असल्याने तो तोल जाऊन पात्रात पडला आणि प्रवाहात वाहून गेला. पोलिसांनी बचाव पथकाच्या मदतीने रविवारी सायंकाळपर्यंत त्याचा शोध घेतला; पण त्याचा थांगपत्ता लागला नाही. सोमवारी पुन्हा आरमोरीसह ब्रम्हपुरी पोलिसांनी मिळून शोधमोहीम राबविली असता, डोर्ली घाटात अभिनवचा मृतदेह सापडला.
धरणाचे पाणी सोडल्याने वाढला प्रवाह
मागील तीन दिवसांपूर्वी गोसे खुर्द धरणामधून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला. वाहत्या पाण्याला आणखी धार आली. त्यात अभिनवला पोहता येत नव्हते. त्यामुळे आईने त्याला खोल पाण्याकडे जाण्यास रोखण्याचा प्रयत्न केला; पण काळाने अभिनवला तिकडे खेचून नेले. अभिनव काही वेळातच दिसेनासा झाल्याने त्याची आई घाबरली. तिने मदतीसाठी आरडाओरड केली; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आरमोरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी बचाव पथकामार्फत संध्याकाळपर्यंत शोध घेतला.
शिक्षक दाम्पत्यावर आघात
अभिनव हा आरमोरी येथील महात्मा गांधी विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक दौलत कुथे आणि जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षिका अनिता कुथे यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याला एक मोठी बहीण असून, ती डॉक्टर आहे. तरुण मुलाच्या अशा अकाली जाण्याने शिक्षक दाम्पत्यावर मोठा आघात झाला असून, त्यांची सर्व स्वप्नं भंग झाली आहेत. आरमोरीकरांमध्येही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.