अभियंत्यांचे वेतन प्रलंबित
By admin | Published: May 12, 2016 01:23 AM2016-05-12T01:23:05+5:302016-05-12T01:23:05+5:30
सर्व शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सात अभियंत्यांचे आॅक्टोबर २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीतील ...
सेवेला मुदतवाढही नाही : सहा महिन्यांचे
गडचिरोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सात अभियंत्यांचे आॅक्टोबर २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीतील सहा महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे. तसेच या कंत्राटी अभियंत्यांच्या सेवेला शासनाकडून अद्यापही मुदतवाढ मिळाली नाही. परिणामी जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्गखोली, किचन शेड, शौचालय व इतर बांधकामांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र या प्रश्नाबाबत राज्य सरकार उदासीन आहे.
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अधिनस्त ५४ साधन व्यक्ती, ७८ अपंग समावेशीत शिक्षण, १२ लेखा लिपीक, १५ संगणक परिचालक व सात अभियंते अशा एकूण १६६ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली अहे. अभियंते वगळून इतर सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेला मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व शिक्षा अभियानात जवळपास १३ ते १४ शाखा आहेत. यामध्ये बांधकाम, मोफत पाठ्यपुस्तक, संगणक, अपंग समावेशीत शिक्षण, शाळाबाह्य विद्यार्थी, हंगामी वसतिगृह व इतर शाखांचा समावेश आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जि.प. शाळांमध्ये सन २०१५-१६ या वर्षात एकूण ५९ किचनशेडचे काम मंजूर करण्यात आले आहे. या कामांसाठी शासनाकडून निधीही प्राप्त झाला आहे. यापैकी जवळपास २० कामे सुरू आहेत, असे असतानाही शासनाने बांधकामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अभियंत्यांच्या सेवेला मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे कंत्राटी अभियंते चिंताग्रस्त आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
मार्च २०१७ पर्यंत मुदत
शहरी व ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने राज्य शासनाने २००३ पासून सर्व शिक्षा अभियान सुरू केले. या अभियान प्रकल्पाची मुदत मार्च २०१७ अखेरपर्यंत आहे. त्यानंतर शासन या प्रकल्पाची मुदत वाढविते की काय हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. सर्व शिक्षा अभियान प्रकल्पाला मुदतवाढ न दिल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांवर संकट कोसळणार आहे.