इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकविणे बंधनकारक, अन्यथा होणार लाखाचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 03:47 PM2021-11-19T15:47:26+5:302021-11-19T16:34:37+5:30
जिल्ह्यातील सर्वच इंग्रजी शाळांना यापुढे विद्यार्थ्यांना मराठी शिकविणे, त्यासाठी खास तासिका आपल्या वेळापत्रकात ठेवणे बंधनकारक झाले आहे. मराठीचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर आता विभागाची नजर राहणार आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गरजेनुसार इंग्रजी भाषा आवश्यक असली तरी महाराष्ट्रात मराठी भाषा महत्त्वाची आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकविणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, काही शाळा यातून पळवाट काढतात. मराठी भाषेच्या अध्यापनाला अधिकाधिक व्यापक करण्यासाठी आता शिक्षण विभागाने इंग्रजी माध्यमांच्या शाळांना एक लाख रुपयांचा दंड ठाेठावण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राथमिक शिक्षण संचालकांनी अलीकडेच सर्व विभागीय उपसंचालकांना तसे निर्देश दिले आहेत. यानंतर गडचिराेली जिल्ह्यातील इंग्रजी शाळाही आता अलर्ट झाल्या आहेत. ज्या इंग्रजी शाळा विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे शिक्षण देणार नाहीत, अशा शाळांवर आता दंडात्मक कारवाई हाेणार आहे. गडचिराेली शहरासह जिल्हाभरातील सर्वच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना यापुढे विद्यार्थ्यांना मराठी शिकविणे, त्याअनुषंगाने मराठी भाषेच्या तासिका आपल्या वेळापत्रकात समाविष्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मराठी भाषेचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर आता विभागाची नजर राहणार आहे.
मराठी शिकविणे आवश्यक
राज्य सरकारने मराठी भाषा शिकणे व शिकविणे कायदा २०२० मंजूर केला आहे. त्यामुळे याबाबत टाळाटाळ करणाऱ्या शाळांची तक्रार पालकांना आता करता येेणार आहे. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेतून प्रशासकीय व शासकीय कारभार चालविला जाताे. मराठी भाषेबाबत अनेकदा जनजागृती माेहीम राबविली जाते. मात्र, याकडे काही लाेक दुर्लक्ष करतात. आता मराठीचे अध्यापन अनिवार्य करण्यात आले आहे.
एक लाखापर्यंत दंड
- गडचिराेली जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या ज्या शाळा मराठी भाषेचे अध्यापन करणार नाहीत, अशा शाळांकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल करावा व तसा प्रस्ताव शिक्षण संचालनालयाकडे सादर करावा, असे निर्देश आहेत.
पालकांकडून स्वागत
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व्हावे, ही बऱ्याच वर्षांपासूनची मागणी आहे. तसा निर्णय झालेला असतानासुद्धा काही शाळा याबाबत उदासीन हाेत्या. आता आर्थिक दंडाचा निर्णय याेग्य असून, जिल्ह्यातील शिक्षक व पालकांनी त्याचे स्वागत केले.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांना मराठी मुळीच येत नाही. कारण त्याला मराठी विषय शिकविला जात नाही. विद्यार्थ्यांना मराठी अंकाची ओळख नसल्याने अनेकदा व्यवहारात अडचणी येतात. अशा अडचणी येऊ नये याकरिता मराठी भाषेचे अध्यापन सक्तीचे करणे आवश्यक आहे.
- प्रेमिला बाेकडे, पालक
मराठी ही महाराष्ट्र राज्याची मातृभाषा आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी व नागरिकाला मराठी भाषा अवगत असली पाहिजे. मराठी भाषा ज्ञात नसलेल्या इंग्रजी माध्यमातून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक अडचणी येतात. मराठी न शिकविणाऱ्या शाळांचा आढावा विभागाच्या वतीने नेहमी घेण्यात येणार आहे.
- हेमलता परसा, शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प., गडचिराेली