गडचिरोली लोकसभा निवडणूक निकाल २०१९; अशोक नेतेंनी घेतली ८ हजारांची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:06 AM2019-05-23T10:06:58+5:302019-05-23T10:07:49+5:30
Gadchiroli Lok Sabha Election Results 2019; लोकसभेसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीत भाजपचे नेते अशोक नेते यांनी ८ हजार मतांहून अधिकची आघाडी घेतल्याचे वृत्त आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी हे नेते यांच्यासमोरचे आव्हान आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: लोकसभेसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीत भाजपचे नेते अशोक नेते यांनी ८ हजार मतांहून अधिकची आघाडी घेतल्याचे वृत्त आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी हे नेते यांच्यासमोरचे आव्हान आहे.
या निवडणुकीच्या रिंगणात पाच उमेदवार आहेत. भाजपचे अशोक नेते, काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी, वंचित बहुजन आघाडीचे डॉ.रमेशकुमार गजबे, बसपाचे हरिचंद्र मंगाम आणि आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे देवराव नन्नावरे हे पाच उमेदवार उभे आहेत. मात्र खरी लढत भाजप आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये आहे. गेल्यावेळीही याच दोन उमेदवारांमध्ये लढत होऊन नेते यांनी एकतर्फी विजय मिळविला होता. यावेळी ही लढत अटीतटीची असल्याचे वातावरण आहे.
तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या सिरोंचा तालुका ते छत्तीसगड सीमेवरील सालेकसा तालुक्यापर्यंत ५०० कि.मी. पेक्षा जास्त लांब असलेल्या गडचिरोली-चिमूर या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव लोकसभा मतदारसंघात यावेळी दुहेरी लढत होती. विद्यमान खासदार असलेले भाजपचे अशोक नेते आणि गेल्यावेळी पराभूत झालेले काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. गेल्यावेळी नेते यांनी तब्बल २ लाख ३६ हजार मतांच्या फरकाने बाजी मारली होती.
नक्षलवाद, बेरोजगारी, उद्योगधंद्यांचा अभाव, मागासलेपण हे या मतदारसंघातील परंपरागत मुद्दे आजही कायम आहेत. या मतदारसंघाने आलटून पालटून अनेक लोकप्रतिनिधी पाहिले. पण या परंपरागत मुद्यांमध्ये फारसा बदल झालेला दिसला नाही. त्यामुळे ही परिस्थिती बदलवण्याचे स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठिशी मतदार उभा राहील असे चित्र या मतदारसंघात आहे.