गुजरीत जड वाहनांसाठी रस्ता द्या
By admin | Published: June 12, 2014 12:04 AM2014-06-12T00:04:56+5:302014-06-12T00:04:56+5:30
येथील सर्वोदय वार्डातील गुजरीकरिता जड वाहनाच्या वाहतुकीसाठी कायमस्वरूपी रस्त्याची सुविधा करण्यात यावी, अशी मागणी नगरपरिषद मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
गडचिरोली : येथील सर्वोदय वार्डातील गुजरीकरिता जड वाहनाच्या वाहतुकीसाठी कायमस्वरूपी रस्त्याची सुविधा करण्यात यावी, अशी मागणी नगरपरिषद मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मात्र रस्त्याबाबत अद्यापही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. येत्या आठ दिवसात न्याय न मिळाल्यास गुजरीतील भाजीपाला विक्री बेमुदत बंद ठेवण्यात येईल, असा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत गुजरीतील विक्रेत्यांनी दिला.
यावेळी माहिती देतांना सर्वोदय सब्जी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र बाळेकरमकर म्हणाले, गुजरीत भाजीपाल्यांची जडवाहने येण्यासाठी रस्ता नाही. सध्या विठ्ठल मंदिराच्या बाजुचा एकच मार्ग आहे. मात्र या मार्गावरील नाली फुटली असून मोठा खड्डा निर्माण झाला आहे. पावसाळ्यात सदर नाली पूर्णत: खचणार आहे. यामुळे पावसाळ्यात सदर रस्ता बंद होण्याची दाट शक्यता आहे. पावसाळ्यात रस्त्याअभावी विक्रेत्यांना भाजीपाला दुकानस्थळी नेण्यासाठी अडचण निर्माण होते. यामुळे नगर परिषद प्रशासनाने ठोस पावले उचलून गुजरीकरिता जडवाहनासाठी कायमस्वरूपी रस्ता निर्माण करून द्यावा, अशी मागणी बाळेकरमकर यांनी यावेळी केली.
रस्ता समस्येची तक्रार नगर परिषदेकडे करण्यात आली. त्यानंतर न. प. चे मुख्याधिकारी रविंद्र ढाके यांनी अभियंत्यासह गुजरीला भेट देऊन पाहणी केली. भाजी विक्रेत्यांशी चर्चा केली. मात्र रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला नाही. गुजरी भाजी बाजारामधून लिलावाच्या माध्यमातून नगर परिषेदला मोठ्या प्रमाणा उत्पन्न मिळते. आठवडी बाजार व गुजरीचा मिळून १२ लाख रूपयाचे कंत्राट खासगी कंत्राटदाराला देण्यात आले असल्याची माहिती असोसिएशनचे सचिव महेश हजारे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शरद चापले, सुरज शिरपूरकर, प्रविण पुप्पलवार, महेश चिलबुले, शामसुंदर निलेवार, भोजराज खोडवे, प्यारेअली सय्यद, कालिदास लटारे, दिनेश कांबळे, वामन गिरडकर, यशवंत भुरसे, भूषण थोरात, निलेश आंबोरकर, मिलिंद लिंगायत, सुरेश सोनटक्के, अतुल कुनघाडकर, तुपीन घोष, अमोल बाळेकरमकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)