चामोर्शीत संपूर्ण बाजारपेठ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 11:21 PM2020-08-27T23:21:58+5:302020-08-27T23:22:22+5:30
औषधी दुकाने व दवाखाने वगळता सर्व दुकाने व बाजारपेठ पूर्णत: बंद होती. गुरूवारी प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांची रॅपिड टेस्ट केली. सकाळपासूनच तपासणीला सुरूवात झाली. येथील अंगणवाडीत दिवसभरात एकूण १०२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यापैकी २८ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले असून त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/चामोर्शी : बुधवारी करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये एकूण १७ व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्यानंतर चामोर्शी शहरात दहशतीचे सावट पसरले आहे. दरम्यान गुरूवारी जिल्हाभरात एकूण ५६ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. चामोर्शी येथे आठवडी बाजाराचा दिवस असताना सुध्दा जनता कर्फ्यू पाळण्यात आला. मेडिकल वगळता चामोर्शी शहरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती.
औषधी दुकाने व दवाखाने वगळता सर्व दुकाने व बाजारपेठ पूर्णत: बंद होती. गुरूवारी प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांची रॅपिड टेस्ट केली. सकाळपासूनच तपासणीला सुरूवात झाली. येथील अंगणवाडीत दिवसभरात एकूण १०२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यापैकी २८ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले असून त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. अगोदरचे १७ व गुरूवारी निघालेले २८ असे मिळून एकूण ४४ व्यक्ती बाधित आढळून आले आहेत. उर्वरित व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार संजय गंगथळे यांनी दिली.
संपर्कातील १४ जणांचे विलगीकरण
सिरोंचा : सिरोंचा येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ३० जणांपैकी १४ जणांना २६ आॅगस्ट रोजी बुधवारला आरोग्य विभागाच्या वतीने संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. आणखी संपर्कातील १६ जणांचा शोध सुरू आहे. या १६ जणांना गुरूवारी क्वॉरंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती सिरोंचातील तालुका आरोग्य अधिकारी मनोहर कन्नाके यांनी दिली. नगरम मार्गावरील धर्मपुरी गावाजवळील शासकीय आश्रमशाळेत या १४ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. ३० जणांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. सिरोंचा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
विविध ठिकाणच्या रूग्णांचा समावेश
गडचिरोली : चामोर्शी शहराच्या प्रतिबंधीत क्षेत्रातील बुधवारी सायंकाळच्या सुमारास १६ व गुरूवारी नवीन २७ असे एकूण ४४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले व इतर ठिकाणी १२ असे एकूण ५६ नवीन कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आले. चामोर्शी येथील एक लॅब कामगारही बाधित झाला आहे. अहेरी येथील विलगीकरण कक्षात ४, गडचिरोली येथील ५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये ब्रह्मपुरी येथून आलेला १, सर्वोदय वार्डातील २, बुलढाणा येथून आलेला १ प्रवासी व सामान्य रूग्णालयातील १ रूग्ण आदींचा समावेश आहे. याशिवाय देसाईगंज तालुक्यातील दोन एसआरपीएफ जवान व कुरखेडातील एक दुकानदार कोरोनाबाधित आढळून आला आहे. आष्टी व आरमोरी येथील एक-एक रूग्ण कोरोनामुक्त झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील क्रियाशील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १५२ झाली आहे. एकूण बाधित ९९२ रूग्णांपैकी ८३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.