गुरवळा नेचर सफारीत नव्या वाघांची एंट्री; चार बछड्यांसह वाघिणीचा वावर
By गेापाल लाजुरकर | Published: May 23, 2023 12:43 PM2023-05-23T12:43:41+5:302023-05-23T12:45:05+5:30
पर्यटकांचा ओढा वाढला; निसर्गानुभवात अनेकांना हाेतेय दर्शन
गाेपाल लाजूरकर
गडचिराेली : जिल्ह्यात गत ४ वर्षांपासून वाघांचा वावर वाढून सध्या त्यांची संख्या ५० वर पाेहाेचल्याने येथील जंगलातसुद्धा वाघ दिसून येत आहेत. हाच धागा पकडून ताडाेबाच्या धर्तीवर वाघ, बिबट व अस्वल पाहता यावे यासाठी गडचिराेली तालुक्याच्या गुरवळा येथे निसर्ग सफारी सुरू केली. विशेष म्हणजे, आता येथे नवीन वाघांची एन्ट्री झाल्याने या सफारीद्वारे निसर्गानुभव घेणाऱ्यांनाही आता वाघ, बिबट, अस्वलांसह तृणभक्षी प्राण्यांचे दर्शन हाेत आहे. गडचिराेली जिल्ह्याच्या विविध भागांत वाघ, बिबट व अस्वल यासारख्या हिंस्र प्राण्यांचा वावर आहे. निसर्गानुभव, तसेच वाघ, बिबट व अस्वलासारखे हिंस्र प्राणी आता गुरवळाच्या निसर्ग सफारीत दिसून येत आहेत. त्यामुळे येथे भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
काेणकाेणत्या वाघांचा वावर ?
गुरवळा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीअंतर्गत संचालित नेचर सफारीचे क्षेत्र ३ हजार ७३२ हेक्टर आर जागेत विस्तारले आहे. ५२ किमीचे रस्ते येथे तयार केले आहेत. सध्या सफारीच्या या जंगलात जी-१, जी-१६ हे नरवाघ वावरत असून, जी-१० ही वाघीणसुद्धा आपल्या ४ बछड्यांसह वावरत आहे. याशिवाय अस्वल, तडस, रानकुत्रे, नीलगाय, हरिण, रानडुकरे यासह विविध तृणभक्षी प्राण्यांचा वावर आहे.
बंग दाम्पत्यालाही सफारीची भुरळ; वाघाचे दर्शन
ज्येष्ठ समाजसेवक तथा ‘सर्च’चे संचालक डाॅ. अभय बंग व डाॅ. राणी बंग यांनी रविवार, २१ मे राेजी गुरवळा नेचर सफारीत निसर्गानुभव घेतला. यावेळी त्यांनाही वाघांसह विविध तृणभक्षी प्राण्यांचे दर्शन झाले. त्यांनी दुपार ते सायंकाळच्या सत्रातील निसर्ग सफारीचा आनंद घेतला. विशेष म्हणजे, २० मे राेजी दाेन वेगवेगळ्या वाघांचे दर्शन पर्यटकांना झाले हाेते.
कसा व केव्हा घेता येईल सफारीचा आनंद ?
नेचर सफारीद्वारे प्राणी बघण्यासह निसर्गानुभव घेण्यासाठी वन समितीतर्फे ९ गाइडची नियुक्ती केली आहे. हे गाइड एका दिवसात किमान ८ वाहनांच्या माध्यमातून पर्यटकांना निसर्गानुभव घडवून आणतात. सकाळी ६ ते १० व दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत (उन्हाळ्यात) सफारीचा अनुभव पर्यटकांना घडवून आणतात. १ जुलै ते ३१ ऑक्टाेबर हा पावसाळ्याचा कालावधी वगळता उन्हाळा व हिवाळ्यात सफारीतील पर्यटन सुरूच असते. पर्यटनासाठी गाइड किंवा समितीच्या माेबाइल क्रमांकावर नाेंदणी करावी लागते.
प्रवेशासाठी शुल्क किती?
निसर्ग सफारीत प्रवेशासाठी स्वत:चे चारचाकी वाहन असेल तर १ हजार रुपये शुल्क भरावे लागते, समितीने नेमलेले जिप्सी वाहन वापरायचे असल्यास ३ हजार रुपये शुल्क भरावे लागते. एका कुटुंबासाठी हे शुल्क ग्राह्य धरले जाते. एकूण शुल्कापैकी ६०० रुपये गाइडला तर ४०० रुपये समितीला दिले जातात.
चालू वर्षात गत ५ महिन्यांत नेचर सफारीत वाघांचा वावर वाढला, तसेच येथे भेट देणाऱ्या पर्यटकांनाही वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, तडस आदी हिंस्र प्राण्यांचे दर्शन हाेत आहे. त्यामुळे पर्यटकांनी सफारीला आवर्जून भेट द्यावी.
- साेनल भडके, सहायक वनसंरक्षक वनविभाग, गडचिराेली