पर्यावरणाबाबत जनजागृतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2017 12:42 AM2017-06-05T00:42:18+5:302017-06-05T00:42:18+5:30
वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पर्यायी पर्यावरणाचे रक्षण करणे काळाची गरज आहे.
जागतिक पर्यावरण दिन : औद्योगीकरण व शहरीकरणाचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पर्यायी पर्यावरणाचे रक्षण करणे काळाची गरज आहे. पर्यावरणाचे संंरक्षण केवळ सरकारची जबाबदारी नसून भविष्यातील धोके टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनाची सुरूवात स्वत:पासून करणे गरजेचे आहे.
दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे व पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी, म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. औद्योगिक क्रांतीनंतर मानवाचे जीवन सुखी झाले. अनेक यंत्र मानवाच्या सुखासाठी सज्ज झाले. मात्र दुसऱ्या बाजूला या औद्योगिक क्रांतीची विषारी फळेही मानवाला पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे चाखायला मिळू लागली. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन ही अत्यंत महत्त्वाची बाब निर्माण झाली आहे.
जागतिक स्तरावर पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. राज्य शासनाने पर्यावरणाचे महत्त्व ओळखून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही हा विषय आवश्यक केला आहे. या माध्यमातून जागृती निर्माण केली जात आहे.
जिल्हा पर्यावरण संवर्धनाचा मार्गदर्शक
गडचिरोली जिल्ह्यात एकूण भूभागाच्या ७८ टक्के जमीन जंगलाने व्यापली आहे. येथील जनता मागील अनेक वर्षांपासून या जंगलाचे पोटच्या पोराप्रमाणे संरक्षण करीत आहे. गडचिरोलीत उद्योगांची संख्या नगण्य असल्याने पर्यावरण प्रदुषणाचे प्रमाणही अत्यंत कमी आहे. गडचिरोली जिल्हा पर्यावरण संवर्धनाबाबत इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.
वन विभागाच्या प्रकल्पातून रोजगाराच्या संधी उपलब्ध
जंगलाच्या संरक्षणाचे लाभ जिल्ह्यातील नागरिकांना चाखायला मिळत आहेत. हजारो नागरिकांना वन पट्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना हक्काची जमीन उपलब्ध झाली आहे. वनोपज गोळा करण्याचे हक्क बहाल झाल्याने रोजगाराची समस्या सुटली आहे. वन विभागाने अगरबत्ती प्रकल्प, जैवविविधता प्रकल्प सुरू केल्याने रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
कॉर्बनडाय आॅक्साईडचे प्रमाण वाढले
वाढत्या जंगलाच्या ऱ्हासामुळे वातावरणातील कॉर्बनडाय आॅक्साईडचे प्रमाण वाढले आहे. याचे गंभीर परिणाम संपूर्ण सजीवसृष्टीला भोगावे लागत आहेत. कॉर्बनडॉय आॅक्साईडचे प्रमाण कमी करून आॅक्सीजनचे प्रमाण वाढविण्यासाठी झाडांची संख्या वाढविणे हा एकमेव उपाय असल्याने प्रत्येक नागरिकाने दरवर्षी एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलावी.
जंगलतोड थांबविण्यासाठी गॅस वाटप
वन व्यवस्थापन समित्यांचे सदस्य व नागरिकांना जंगलाचे महत्त्व पटवून देण्यात आले. जंगलाची तोड होऊ नये म्हणून गॅसचे वितरणही करण्यात आले आहे. वन विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस पहारा देत असल्याने जंगलतोडीच्या प्रमाणात लक्षणिय घट झाली आहे. तर दुसरीकडे जंगलात वन्य जीवांची संख्या वाढत चालली आहे. वन्य जीवांसाठी पाणवठे तयार करण्यात आले आहेत.