जिल्ह्यात ट्रॉमा केअरसह सुसज्ज रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 05:00 AM2022-05-25T05:00:00+5:302022-05-25T05:00:46+5:30

जिल्ह्यातील पोलिसांवर त्वरित उपचार करता यावेत, तसेच स्थानिक आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्ह्यात ट्रॉमा केअरसह सुसज्ज असे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय तयार करण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी आर्थिक तरतूद करण्यासोबतच तज्ज्ञ स्टाफच्या नेमणुकीसाठी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश पवार यांनी दिले.

Equipped hospital with trauma care in the district | जिल्ह्यात ट्रॉमा केअरसह सुसज्ज रुग्णालय

जिल्ह्यात ट्रॉमा केअरसह सुसज्ज रुग्णालय

googlenewsNext

लेाकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील पोलिसांवर त्वरित उपचार करता यावेत, तसेच स्थानिक आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्ह्यात ट्रॉमा केअरसह सुसज्ज असे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय तयार करण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी आर्थिक तरतूद करण्यासोबतच तज्ज्ञ स्टाफच्या नेमणुकीसाठी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश पवार यांनी दिले. सोबतच कोनसरी लोहखनिज प्रकल्पाच्या मदतीसाठी जिल्ह्यात विमानतळ आणि गडचिरोली-कोनसरी या रेल्वेमार्गाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देशदेखील पवार यांनी दिले.
गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात मंगळवारी मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, अपर मुख्य सचिव नियोजन  नितीन गद्रे, प्रधान सचिव नागरी विमान वल्सा नायर, वित्तीय सुधारणा सचिव ए. शैलजा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

२०० एकर जमिनीवर विमानतळ 
गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळण अधिक गतिमान व्हावे, यासाठी जिल्ह्यात सुमारे २०० एकर जमिनीवर विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी लागणाऱ्या जमिनीची उपयुक्तता तपासून घेण्यासाठी ही माहिती विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवावी, असे वल्सा नायर यांनी सांगितले. विमानतळ उभारणीसाठी एअरपोर्ट अथॉरिटीकडून शक्यता (फिजिबिलीटी) तपासून तांत्रिक पाहणी केली जाईल, असे कपूर म्हणाले.

रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य शासन संमतीपत्र देणार

गडचिरोली जिल्हातील वडसा- गडचिरोली- कोनसरी रेल्वे मार्गाच्या उभारणीला २०१५ साली मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली होती. मात्र हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी लागणा-या परवानग्या आणि वित्तीय मान्यता मिळणे अद्याप बाकी होते. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास कोनसरी येथील प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पाला त्याचा फायदा होईल तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे शक्य होईल. त्यामुळे या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आले.

पालकमंत्री शिंदे यांच्या मागणीला प्रतिसाद
-    यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यात होणारे नक्षलवाद्यांचे हल्ले पाहता, जखमी होणाऱ्या पोलिसांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी सर्व सोयींनीयुक्त लष्कराच्या धर्तीवर दीडशे खाटांचे रुग्णालय तयार करावे आणि त्यातील ५० खाटा ट्रॉमा केअरसाठी राखीव ठेवाव्यात, असे सूचविले. त्याला मान्यता देण्यात आली. या नव्याने तयार होत असलेल्या रुग्णालयात सिटी स्कॅन, एमआरआय यासारख्या अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. याठिकाणी नेमणूक देताना डॉक्टरांना विशेष पॅकेज देऊन तज्ज्ञ स्टाफची नेमणूक करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या  अध्यक्षतेखाली समिती नेमा, असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले. 

या प्रकल्पाबाबत रेल्वेला तत्काळ संमतीपत्र देऊन त्यानंतर सुधारित वित्तीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणून तो संमत करून घ्यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

गडचिरोली ते कोनसरी हा ६० किलोमीटरचा रेल्वेमार्ग तयार होऊन गडचिरोली रेल्वेमार्गाने जोडला गेल्यास हा दुर्गम भाग रेल्वेने जोडला जाईल. याभागात अनेक उद्योजक आकर्षित होतील आणि रोजगारास चालना मिळेल, नक्षल भागात रोजगार निर्मिती झाल्यास त्याचा फायदा इथला नक्षलवाद कमी होण्यास होईल.

 

Web Title: Equipped hospital with trauma care in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य