चामाेर्शी तालुक्यात कृषी संशाेधन केंद्र स्थापन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:37 AM2021-07-31T04:37:07+5:302021-07-31T04:37:07+5:30
जिल्हा विकासाचा आराखडा तयार करताना जिल्हा मुख्यालयाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जातात. त्यामुळे विद्यापीठ असो वा शासकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी ...
जिल्हा विकासाचा आराखडा तयार करताना जिल्हा मुख्यालयाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जातात. त्यामुळे विद्यापीठ असो वा शासकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, कृषी महाविद्यालये, राष्ट्रीय संस्था, संशोधन संस्था, महत्त्वाची कार्यालये ही जिल्हा मुख्यालयातच स्थापन केली जातात. त्यामुळे विकासात्मक संस्था जरी जिल्ह्यात स्थापन झाल्या तरी तालुका मुख्यालये प्रत्यक्ष विकासापासून दूरच असतात. एक महाविद्यालय वा संस्था स्थापन झाल्यानंतर त्याचा फायदा संपूर्ण जिल्ह्याला जरी झाला तरी त्यापासून निर्माण होणाऱ्या अप्रत्यक्ष रोजगाराच्या फायदा फक्त जिल्हा मुख्यालयालाच होताे. अशा प्रकारे सर्वच महाविद्यालये वा संस्था एकाच ठिकाणी निर्माण होत असल्यामुळे जिल्हा मुख्यालयाचा विकास होतो व उर्वरित तालुकास्थळे विकासापासून मागासच राहतात. शिवाय रोजगाराकरिता लोकांचा ओढा जिल्हा ठिकाणी वाढतो. त्यातून नागरीकरणाची समस्या निर्माण होते व अतिरिक्त लोकसंख्येचा भार सहन करावा लागतो. त्यामुळे मूलभूत सोयीसुविधा तोकडी पडते. चामोर्शी तालुका कृषिप्रधान तालुका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन व संशाेधनासाठी कृषी संशोधन संस्था शासनाने तालुक्यात स्थापन करावी, अशी मागणी विवेक सहारे यांनी केली.
बाॅक्स
चामाेर्शीत वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करा
आरोग्याच्या दृष्टीने गडचिरोलीनंतर पर्यायी वैद्यकीय केंद्र म्हणून चामोर्शी तालुक्याला विकसित करण्याची आवश्यकता आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये चामाेर्शी तालुक्यात निर्माण करावी. वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचा उपयोग फक्त प्रेक्षणीय स्थळ वा सहलीचे ठिकाण इतक्यापुरतेच मर्यादित न ठेवता चामोर्शी तालुक्यातच नव्हे तर इतरही तालुक्यांना बॅरेजचे पाणी उपलब्ध करावे. वैनगंगा नदीतील पाण्याचा उपयाेग शेतीवर आधारित उद्याेगांसाठी करता येईल काय, याचाही अभ्यास करावा, असे सहारे यांनी म्हटले आहे.