उपविभागात उद्योग स्थापन करा
By admin | Published: February 8, 2016 01:29 AM2016-02-08T01:29:26+5:302016-02-08T01:29:26+5:30
अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड, सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वन संपत्ती व मुबलक प्रमाणात खनिज साठे उपलब्ध आहेत.
मुख्यमंत्र्यांकडे मागणी : अहेरी कृती समितीचे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अहेरी : अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड, सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वन संपत्ती व मुबलक प्रमाणात खनिज साठे उपलब्ध आहेत. मात्र उद्योगविरहित उपविभाग असल्याने उपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग होत नाही. या साधन संपत्तीचा सदुपयोग झाल्यास बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे अहेरी उपविभागात देवलमरी येथे सिमेंट उद्योग व आलापल्ली येथे पेपर मिल स्थापन करावी, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
उपविभागात रोजगारांचा अभाव असल्याने येथील युवा रोजगारासाठी भटकंती करीत आहे. अनेक युवक परराज्यात रोजगारासाठी स्थलांतर करीत आहेत. येथील संसाधनांचा योग्य वापर केल्यास बेरोजगारांना रोजगारासह येथील भविष्यातील पिढींचीही घडण होऊ शकते. त्यामुळे देवलमरी येथे सिमेंट उद्योग व आलापल्ली येथे कागद कारखाना स्थापन करावा. तेलंगणा राज्याच्या सीमेवर कागजनगर येथे रेल्वे जंक्शन आहे. त्यामुळे या भागात रेल्वे सुरू होण्यास काही अडथळा नाही. रेल्वे मार्गामुळे उद्योग व्यवसायाला भरभराट येऊ शकते. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार प्राप्त होऊ शकतो, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र अरमरकर यांनी स्वीकारले. निवेदन देताना अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, उपाध्यक्ष डॉ. पी. एल. ढेंगळे व समितीचे पदाधिकारी, सदस्य हजर होते. (शहर प्रतिनिधी)