एटापल्लीतील मीठ छत्तीसगड राज्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:00 AM2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:01:15+5:30
गडचिरोली जिल्ह्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची अफवा आठ दिवसांपूर्वी पसरली. त्यानंतर प्रत्येक गावापासून शहरापर्यंत नागरिकांनी दुकानांमध्ये धाव घेऊन मिठाची खरेदी करण्यास सुरूवात केली. प्रत्येकजण केवळ मिठाचे पुडे खरेदी न करता संपूर्ण बॅग खरेदी करू लागले. यातही एकाच बॅगवर समाधान न ठेवता दोन ते तीन बॅग घेऊ लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : छत्तीसगड राज्यातून निर्माण झालेले मीठ तुटवड्याचे लोण कोरची तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पसरले. त्यानंतर दुकानदारांकडून जादा दराने मिठाची विक्री सुरू झाली. एटापल्ली शहरात मीठ खरेदी करण्याकरिता छत्तीसगड राज्यातून अनेक नागरिक येत आहेत. दुचाकीवर शक्य असलेल्या मिठाच्या बॅग मांडून त्याची सर्रास वाहतूक होत असल्याने तालुक्यात मिठाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची अफवा आठ दिवसांपूर्वी पसरली. त्यानंतर प्रत्येक गावापासून शहरापर्यंत नागरिकांनी दुकानांमध्ये धाव घेऊन मिठाची खरेदी करण्यास सुरूवात केली. प्रत्येकजण केवळ मिठाचे पुडे खरेदी न करता संपूर्ण बॅग खरेदी करू लागले. यातही एकाच बॅगवर समाधान न ठेवता दोन ते तीन बॅग घेऊ लागले. मीठ तुटवड्याच्या या अफवेचे लोण संपूर्ण जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण व अतिदुर्गम भागातही पसरले. एटापल्ली तालुका छत्तीसगडला लागून आहे. त्यामुळे आधीच छत्तीसगडमध्ये मिठाचा तुटवडा असताना येथील अनेक नागरिक दुचाकी वाहनाने आड मार्गाने एटापल्ली तालुक्यात येऊन मिठाची खरेदी करीत आहेत. दुचाकीवर वाहनाच्या क्षमतेनुसार मिठाच्या बॅगा मांडल्या जात आहेत. एटापल्लीतील अनेक किराणा दुकानांमधून छत्तीसगड राज्यात मिठाची वाहतूक केली जात आहे. प्रत्येकजण चार ते पाच बॅगा नेत आहेत. पूर्वी मिठाचे दर १८० रुपये बॅगपर्यंत होते. परंतु आता प्रती बॅग २८० रुपयांच्या वर बॅगाची विक्री केली जात आहे. याबाबत नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग व मुख्याधिकारी अजय साळवे यांना लोकमत प्रतिनिधीने माहिती दिली असता, मंडळ अधिकारी तलाठी व कर्मचाऱ्यांनी किराणा दुकानात जाऊन जादा दराने मिठाची विक्री करू नका, अशा सूचना दिल्या. मात्र तरीही जादा दराने मिठाची विक्री सुरूच आहे.
क्षमतेपेक्षा जास्त साठा निर्माण झाल्यास मागणी कमी होण्याची शक्यता
जिल्ह्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा पसरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मिठाचा तुटवडा नसल्याचे जाहीर केले होते. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले. तरीसुद्धा किराणा दुकानांमध्ये मीठ खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या. आवश्यकतेपेक्षाही अधिक मिठाची खरेदी नागरिकांनी जादा दरात केली. त्यामुळे तीन ते चार महिने पुरेल एवढा साठा नागरिकांनी केला आहे. मागील आठ दिवसांपासून मीठ साठवणुकीचा प्रकार जिल्हाभर सुरू आहे. पुन्हा आठवडाभर सदर प्रकार सुरू राहिल्यास मिठाची मागणी कमी होऊ शकते. या कालावधीत दुकानदारांनी बाहेरून मिठाचा साठा बोलाविल्यास त्यांच्याकडील मीठ खरेदी करण्यास ग्राहक सुद्धा मिळणार नाही, पावसाळाभर त्यांच्याकडील मीठ दुकानात पडून राहू शकते, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा दुकानदार प्रशासनाच्या आवाहनाला न जुमानता चढत्या भावाने मिठाची विक्री करीत आहेत. ग्राहक मात्र खोट्या तुटवड्याच्या भीतीने मिठाची खरेदी करीत आहेत. एटापल्ली तालुक्यात जादा दराने मिठाची विक्री करणाºया दुकानदारांवर स्थानिक प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.