तंबाखू व दारूमुक्त मोहिमेचे मूल्यांकन करा
By Admin | Published: April 19, 2017 02:09 AM2017-04-19T02:09:14+5:302017-04-19T02:09:14+5:30
दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली मोहीम राबविताना याचा थेट संबंध मुख कर्करोगाशी आहे.
विभागीय आयुक्तांचे निर्देश : व्यसनमुक्ती कामाचा घेतला आढावा
गडचिरोली : दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली मोहीम राबविताना याचा थेट संबंध मुख कर्करोगाशी आहे. याची जाणीव सर्वांना करून दिल्यास प्रभावी काम करणे शक्य आहे. जिल्हा प्रशासन व मुक्तीपथच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू व दारू मुक्तीची केवळ मोहीम राबवून चालणार नाही. आजवर व्यसनमुक्तीसाठी अनेक प्रयत्न झाले. आता झालेल्या कामाचे व प्रयत्नाचे योग्य मूल्यमापन केले पाहिजे, असे निर्देश विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिले.
जिल्हा प्रशासन व सर्चच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली कृती दलाची स्थापना करण्यात आली. या कृती दलामार्फत गडचिरोली जिल्ह्यात आजवर झालेल्या कामाचा आढावा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी घेतला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आढावा बैठकीला जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, सर्चचे प्रमुख डॉ. अभय बंग, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल आदी उपस्थित होते. व्यसनमुक्ती मोहिमेचे काम करणाऱ्या गडचिरोली कृती दलाची बैठक नियमित स्वरूपात घेण्यात यावी, झालेल्या कामातून प्रत्यक्ष काय परिणाम झाला, याचे प्रतिबिंब दर्शविणारा अहवाल आगामी बैठकीत सादर करावा, असे आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले.
तंबाखु मुक्तीसाठी कार्यालय तसेच शालेयस्तरावर काम झालेले दिसले पाहिजे. तंबाखुमुळे तोंडाचा कर्करोग होण्याचे परिणाम अधिक आहे. या दृष्टीकोणातून गडचिरोली जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबवा, अशा सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. या संदर्भात प्रशिक्षकांना पुणे येथे प्रशिक्षणासाठी यशदा अंतर्गत असणाऱ्या मास्टर ट्रेनरकडे पाठविले जात आहे. आगामी काळात हे प्रशिक्षण गडचिरोली येथेच देण्याचे काम सर्च संस्थेने करावे, असे अनुपकुमार यांनी सांगितले. सदर आढावा बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी आरोग्य विभागातर्फे तर सर्च संस्थेतर्फे डॉ. मयूर गुप्ता यांनी पॉवरपार्इंटद्वारे सादरीकरण केले. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
कीर्तनातून प्रबोधन
गडचिरोली जिल्ह्याच्या तंबाखू व दारूमुक्त मोहिमेच्या कामाला सर्च संस्थेसोबत टाटा ट्रस्टने मदत देऊ केली आहे. व्यसनमुक्तीवर प्रबोधनात्मक उपक्रम म्हणून सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे कीर्तन चार ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. याशिवाय गडचिरोली येथे मुक्ती दिनाचा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी विनाशुल्क वेळ देऊन व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले, अशी माहिती डॉ. अभय बंग यांनी आढावा बैठकीत दिली.