२४ तासानंतरही रेती तस्करांवर कायदेशीर कारवाई नाही
By admin | Published: February 14, 2017 12:45 AM2017-02-14T00:45:19+5:302017-02-14T00:45:19+5:30
महसूल व उच्च स्तरीय अधिकाऱ्यांनी रेतीघाटावर आकस्मिक धाड टाकून संयुक्त कारवाई केल्यावर वाहनांच्या आकडेवारीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
५८ वाहनांवर कारवाई : १७ वाहने कारवाईस पात्र
सिरोंचा : महसूल व उच्च स्तरीय अधिकाऱ्यांनी रेतीघाटावर आकस्मिक धाड टाकून संयुक्त कारवाई केल्यावर वाहनांच्या आकडेवारीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २४ तास उलटल्यानंतरही रेती तस्करांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.
धाडसत्राची सदर कारवाई उपविभागीय अधिकारी राममूर्ती व अहेरीचे अतिरिक्त अधीक्षक ए. राजा यांच्या नेतृत्वात स्थानिक प्रशासनाच्या पथकाने पार पाडली. चौकशीच्या पहिल्या टप्प्यात नगरम २ च्या गोदावरी घाटावर रेती भरलेले ११ ट्रक आढळून आले. ३० ट्रक्स रिकामे असल्याने त्यांचा कारवाईशी सबंध नाही, असे सांगण्यात आले. रेतीचे ट्रक्स सिरोंचा पोलीस ठाण्यात आणून ठेवले असून संबंधितांविरूध्द कायदेशीर कारवाई प्रस्तावित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नगरम २ वरील ट्रक्सची संख्या ४१ होते. सदर कंत्राट रोशरेड्डी बंडम यांच्या साई कन्स्ट्रक्शनच्या नावे असून ते उपविभागातील अहेरीचे रहिवासी आहेत. नगरम २ हा घाट भूमापन क्रमांक ५२६ च्या दक्षिण/पश्चिमेस गोदावरी पात्रात आहे. रेती उत्खननाचे क्षेत्र ०४.९५ हेक्टर आर असून या क्षेत्रातून ५२ हजार ४७३ ब्रास रेतीचा उपसा अपेक्षीत आहे. त्यापोटी अंतिम अपसेट किंमत ३ कोटी ९३ लक्ष ५५ हजार रूपये असून कंत्राटदाराने अनामत रक्कम ७८ लक्ष ७१ हजार शासनास प्रदान केली असल्याची माहिती आहे.
वडधम मार्गावरील सहा ट्रक्स संयुक्त पथकाने तहसील कार्यालयाजवळ पुढील चौकशीसाठी थांबवून ठेवले आहेत. हे तांत्रिकदृष्ट्या खरे असले तरी प्रत्यक्ष क्वारीत ११ वाहने उभी होती व एक एक्झावेटर होता, असे प्रत्यक्षदर्शी लोकांचे म्हणणे आहे. वडधम, सिरोंचा मार्गावर पकडलेल्या सहा वाहनात अंकिसा मालगुजारी घाटाचा एक व चिंतरेवुला घाटाचा एक ट्रक्सचा समावेश आहे. वडधम घाटाचा कंत्राटदार कोण याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित मंडळ अधिकारी गोवर्धन गागापुरपू यांना फोन संपर्क केला. त्यांनी फोन उचलला. पण निवडणूक कामात व्यस्त असल्याने माहिती उपलब्ध करून दिली नाही. या रेती तस्करीत जिल्हा स्तरापासून अधिकारी व अहेरी स्थित एका लोकप्रतिनिधीचेही संबंध असल्याचे परिसरात बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)