पालिका निर्मितीच्या ५९ वर्षांनंतरही बसस्थानकाची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:09 AM2021-03-04T05:09:20+5:302021-03-04T05:09:20+5:30
देसाईगंज : जिल्ह्यातील एक प्रगत व विकसित तालुका अशी ओळख असलेल्या देसाईगंज तालुक्याच्या निर्मितीला तब्बल २९ वर्षांचा कालावधी ...
देसाईगंज :
जिल्ह्यातील एक प्रगत व विकसित तालुका अशी ओळख असलेल्या देसाईगंज तालुक्याच्या निर्मितीला तब्बल २९ वर्षांचा कालावधी उलटला आहे. नगरपालिका तयार होऊन तब्बल ५९ वर्षे झाली आहेत. मात्र येथे अजूनही बसस्थानक होऊ शकले नाही. आमदार क्रिष्णा गजबे यांनी आरमोरी मार्गावर बसस्थानकाच्या जागेवर मागील वर्षी भूमिपूजन केले. मात्र, अद्याप तरी त्या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम सुरू झालेले नाही. येथे आवार नसलेल्या छोट्याशा बसस्थानकातूनच कारभार सुरू आहे.
देसाईगंज शहरात १ मे १९६१ ला नगर परिषदेची स्थापना झाली. अखंडित अशा चंद्रपूर जिल्ह्यातील ही नगर परिषद नावाजली होती. नंतर गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्यातील देसाईगंज शहराला सन १९९२ साली तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठीदेखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. वेळोवेळी देसाईगंज शहर हे राजकीय अनास्थेला बळी पडलेले आहे. येथे विकासातील अनेक राजकीय अडसर दूर करून विकास करावा लागत आहे. येथील बसस्थानकाची समस्या यापैकीच एक आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती औद्योगिक शहर म्हणून देसाईगंज शहराला ओळखले जाते. जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक याच शहरात आहे. मात्र, या शहरात ३५ वर्षांपूर्वी बांधलेले आवार नसलेले छोटेसे बसस्थानक आहे. शहरातून कुरखेडा, ब्रह्मपुरी, नागपूर, चंद्रपूर, साकोली, गडचिरोली, लाखांदूर, राजुरा यासह संपूर्ण राज्यात धावणाऱ्या बसेस आहेत. पूर्वीपेक्षा शहरातील लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. प्रवाशांची वाढती संख्या बघता येथे बसस्थानक आवश्यक आहे. बसस्थानकाच्या मागणीकडे जातीने लक्ष देऊन आमदार क्रिष्णा गजबे यांनी प्रयत्न करून विधानसभेच्या निवडणुकीपुर्वी आरमोरी मार्गावरील बसस्थानकाच्या जागेवर भूमिपूजन पार पाडले. या भूमिपूजनामुळे शहरवासीयांच्या बसस्थानक बांधकामाच्या आशा पल्लवीत झाल्या; मात्र अद्यापही या कामाला दोन वर्षांनंतरही प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. शासनाने या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.