पालिका निर्मितीच्या ५९ वर्षांनंतरही बसस्थानकाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:09 AM2021-03-04T05:09:45+5:302021-03-04T05:09:45+5:30

देसाईगंज : जिल्ह्यातील एक प्रगत व विकसित तालुका अशी ओळख असलेल्या देसाईगंज तालुक्याच्या निर्मितीला तब्बल ५९ वर्षांचा कालावधी उलटला ...

Even after 59 years of formation of the corporation, we are still waiting for the bus stand | पालिका निर्मितीच्या ५९ वर्षांनंतरही बसस्थानकाची प्रतीक्षाच

पालिका निर्मितीच्या ५९ वर्षांनंतरही बसस्थानकाची प्रतीक्षाच

Next

देसाईगंज : जिल्ह्यातील एक प्रगत व विकसित तालुका अशी ओळख असलेल्या देसाईगंज तालुक्याच्या निर्मितीला तब्बल ५९ वर्षांचा कालावधी उलटला आहे. नगरपालिका तयार होऊन तब्बल ५९ वर्ष झाली तरी अजूनही येथे बसस्थानक होऊ शकलेले नाही. आमदार क्रिष्णा गजबे यांनी आरमोरी मार्गावरील बसस्थानकाच्या जागेवर गतवर्षी भूमिपूजन केले. मात्र, अद्याप तरी त्या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम सुरू झालेले नाही. याठिकाणी आवार नसलेल्या छोटयाशा बसस्थानकातूनच कारभार सुरू आहे.

देसाईगंज शहरात १ मे १९६१ला नगर परिषदेची स्थापना झाली. अखंडित अशा चंद्रपूर जिल्हय़ातील ही नगर परिषद नावाजलेली होती. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्यातील देसाईगंज शहराला १९९२ साली तालुक्याचा दर्जा मिळावा, यासाठीही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. देसाईगंज शहर हे वेळोवेळी राजकीय अनास्थेला बळी पडले आहे. येथे विकासातील अनेक राजकीय अडसर दूर करून विकास करावा लागत आहे. येथील बसस्थानकाची समस्याही यापैकीच एक आहे.

गडचिरोली जिल्हयातील मध्यवर्ती औद्योगिक शहर म्हणून देसाईगंज शहराला ओळखले जाते. जिल्हयातील एकमेव रेल्वेस्थानक याच शहरात आहे. मात्र, या शहरात ३५ वर्षांपूर्वी बांधलेले आवार नसलेले छोटेसे बसस्थानक आहे. शहरातून कुरखेडा, ब्रह्मपुरी, नागपूर, चंद्रपूर, साकोली, गडचिरोली, लाखांदूर, राजुरा यासह संपूर्ण राज्यात धावणाऱ्या बसेस आहेत. पूर्वीपेक्षा शहरातील लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता, येथे बसस्थानक गरजेचे आहे. येथील बसस्थानकाच्या मागणीकडे जातीने लक्ष देऊन आमदार क्रिष्णा गजबे यांनी त्यासाठी प्रयत्न करून विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आरमोरी मार्गावरील बसस्थानकाच्या जागेवर भूमिपूजन केले. या भूमिपूजनामुळे शहरवासियांच्या बसस्थानक बांधकामाच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, दोन वर्षानंतर अद्यापही या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झालेली नाही. शासनाने येथील बसस्थानकाच्या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Even after 59 years of formation of the corporation, we are still waiting for the bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.