प्रसूतीनंतरही ‘त्या’ अभागी मातेचा बाळासह पायीच प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:00:33+5:30

तुर्रेमर्का ते लाहेरीपर्यंत २३ किलोमीटरचा प्रवास पायदळ केल्यानंतर रूग्णवाहिकेने हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रुग्णालय गाठले आणि त्याच दिवशी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे हे दुसरे बाळंतपण होते. इतक्या लांब पायी चालून येणाऱ्या त्या गरोदर मातेला किमान जाताना प्रसुतीनंतर तरी आरामदायक प्रवास करून गावी जाता येईल असे सर्वांना वाटत होते. पण त्या अभावी मातेला परतीच्या प्रवासातही त्याच पद्धतीने पायपीट करावी लागली.

Even after delivery, 'that' unfortunate mother travels on foot with the baby | प्रसूतीनंतरही ‘त्या’ अभागी मातेचा बाळासह पायीच प्रवास

प्रसूतीनंतरही ‘त्या’ अभागी मातेचा बाळासह पायीच प्रवास

Next
ठळक मुद्देपाचव्या दिवशी निघाली गावाकडे : ओल्या बाळंतीणीच्या हिमतीला अनेकांचा सलाम; वर्षानुवर्षे कायम असलेल्या व्यथांबद्दल मात्र चिड

रमेश मारगोनवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : रुग्णालयात सुखरूप प्रसुती व्हावी म्हणून २३ किलोमीटरचे अंतर पायी चालत येऊन त्याच दिवशी प्रसुत झालेल्या अभागी मातेला प्रसुतीनंतर अवघ्या पाचव्या दिवशी पुन्हा पायपीट करत आपले गाव गाठावे लागले. कोणतेही वाहन गावापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्याशिवाय दुसरा पर्याय तिच्याकडे नव्हता. आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची त्या मातेची हिंमत आश्चर्यात टाकणारी आहे. दुसरीकडे विपरित भौगोलिक परिस्थिती आणि कायम दुर्लक्षित अशा नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या व्यथांना अंतच नाही का? अशी संतप्त भावनाही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडा पलीकडे असलेल्या तुर्रेमर्का येथील रोशनी संतोष पोदाडी या महिलेने गेल्या शुक्रवारी (दि.३) तुर्रेमर्का ते लाहेरीपर्यंत २३ किलोमीटरचा प्रवास पायदळ केल्यानंतर रूग्णवाहिकेने हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रुग्णालय गाठले आणि त्याच दिवशी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे हे दुसरे बाळंतपण होते. इतक्या लांब पायी चालून येणाऱ्या त्या गरोदर मातेला किमान जाताना प्रसुतीनंतर तरी आरामदायक प्रवास करून गावी जाता येईल असे सर्वांना वाटत होते. पण त्या अभावी मातेला परतीच्या प्रवासातही त्याच पद्धतीने पायपीट करावी लागली.
प्रसुतीनंतर पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी (दि.७) रोशनीला सुटी झाली. लोकबिरादरी रुग्णालयाने तिला गावी सोडून देण्यासाठी भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयाला माहिती दिली. तेथून रुग्णवाहिका आली. सोबत डॉ.संभाजी भोकरे हेसुद्धा होते. त्या रुग्णवाहिकेने रोशनीसह तिचे बाळ, कुटुंबातील सदस्य आणि गावाकडून सोबत आलेली आशा सेविका पार्वती उसेंडी निघाले. पण लाहेरीच्या पुढे गुंडेनूर नाल्यापर्यंतच त्यांचे वाहन जाऊ शकले. पुढील १८ किलोमीटरचा प्रवास त्यांना पायीच करावा लागला. विशेष म्हणजे त्यात ७ ते ८ किलोमीटर अंतर हे डोंगरदऱ्यांचे आहे.
अनेक महिला प्रसुतीनंतर सव्वा महिन्यापर्यंत घराबाहेरही निघत नाही. पण गडचिरोली जिल्ह्यात रोशनीसारख्या अनेक महिलांना प्रसुतीनंतर अवघ्या पाचव्या दिवशी अनेक किलोमीटरची पायपीट करत गाव गाठावे लागते. या दुर्गम भागातील नागरिकांना विकासाची पहाट कोणत्या जन्मी पहायला मिळणार, अशी भावना नागरिकांमध्ये उमटत आहे. दरवर्षी अनेक महिलांना या परिस्थितीतून जावे लागते. मात्र परिस्थितीमध्ये बदल होत नाही.

तारखेआधीच या, सर्व व्यवस्था करणार
अनेक महिला प्रसुतीसाठी दिलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच दवाखान्यात येतात. पण दुर्गम भागामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे कोणत्याही गरोदर महिलेने १० ते १५ दिवस आधीच लोकबिरादरीच्या रुग्णालयात यावे, त्यांची राहण्याची-जेवणाची सर्व व्यवस्था रूग्णालयाकडून केली जाईल, असे आवाहन हेमलकसा येथील लोकबिरादरी रुग्णालयाच्या वतीने डॉ.दिगंत आमटे यांनी केले आहे.

Web Title: Even after delivery, 'that' unfortunate mother travels on foot with the baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.