७ वर्षांनंतरही मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अपूर्णच; पुरातत्त्व विभागाची दिरंगाई, भाविकांमध्ये संतप्त भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 12:39 PM2023-02-09T12:39:51+5:302023-02-09T12:56:04+5:30
दक्षिणमुखी मंदिर शिल्पकलेचा अप्रतिम नमुना
रत्नाकर बोमिडवार
चामोर्शी (गडचिरोली) : सहाव्या शतकात उभारलेल्या आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या मार्कंडेश्वर मंदिर समूहाच्या जीर्णोद्धाराचे काम सात वर्षांपूर्वी भारतीय पुरातत्त्व विभागाने हाती घेतले; परंतु अजूनही या कामाने वेग घेतलेला नाही. अतिशय संथपणे सुरू असलेले हे काम कधी पूर्ण होईल याची शाश्वती कोणीच देत नाही. यामुळे भाविकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे.
उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या मार्कंडेश्वर मंदिरालगत महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते. यानिमित्ताने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना चार पैसे कमविण्याची संधी मिळते. जिल्ह्यातूनच नाही तर विदर्भातून आणि विदर्भाबाहेरूनही अनेक भाविक महाशिवरात्रीला येथे दर्शनासाठी येतात. अनेक वर्षांपूर्वी या मंदिराच्या मुख्य घुमटावर वीज कोसळल्याने एक बाजू खचली होती. त्यामुळे जीर्णोद्धार करण्यासाठी या दगडी मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचे काम सात वर्षांपूर्वी पुरातत्त्व विभागाने हाती घेतले.
शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना
गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या तीरावरील हे दक्षिणमुखी मंदिर शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिरावरील कोरीव नक्षीकाम पाहण्यासारखे आहे; परंतु पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे मंदिर अर्धवट उभारलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे मंदिरात भक्तिभावाने येणाऱ्यांसह पर्यटक म्हणून येणाऱ्यांचाही भ्रमनिरास होत आहे. राज्याच्या पर्यटन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या भावनांचा आदर करीत या कामाला गती देण्याची मागणी होत आहे.
दिल्ली दरबारी पाठपुरावा करूनही प्रतिसाद नाही
धार्मिक पर्यटनासोबतच येथे दररोज येणाऱ्या भाविकांमुळे स्थानिक नागरिकांना रोजगार, स्वयंरोजगार मिळतो. जीर्णोद्धाराचे काम पूर्ण होऊन याठिकाणी पायाभूत सुविधा वाढविल्यास भाविकांची संख्या वाढेल. त्यासाठी जीर्णोद्धाराचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. या कामाला वेग देण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली; मात्र या कामाला अद्याप अपेक्षित गती मिळालेली नाही.