पावसाळा संपूनही एसटीच्या 25% बसेस आगारातच उभ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2022 09:34 PM2022-11-20T21:34:38+5:302022-11-20T21:35:20+5:30
अहेरी आगारातून दर दिवशी ७४ शेड्युल्ड चालविले जात हाेते. आता केवळ ५४ शेड्युल्ड चालविले जात आहेत. बसेसच्या भंगार अवस्थेमुळे कोणताही टायमिंग दिलेल्या वेळेत जात नसल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक फेरीनंतर बसेसचे कोणते ना कोणते बिघाडाचे काम निघतेच आणि बस दुरुस्त होईपर्यंत चालक आणि वाहकांना वाट पाहावी लागत आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : पावसाळा संपला असला तरी जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था,एसटीचे सुटे भाग उपलब्ध नसणे, डिझेलची कमरता यामुळे गडचिराेली व अहेरी आगारातील २५ टक्के बसेस आगारातच पडून राहतात. यावरून एसटीची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय हाेत असल्याचे दिसून येत आहे.
अहेरी आगारातून दर दिवशी ७४ शेड्युल्ड चालविले जात हाेते. आता केवळ ५४ शेड्युल्ड चालविले जात आहेत. बसेसच्या भंगार अवस्थेमुळे कोणताही टायमिंग दिलेल्या वेळेत जात नसल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रत्येक फेरीनंतर बसेसचे कोणते ना कोणते बिघाडाचे काम निघतेच आणि बस दुरुस्त होईपर्यंत चालक आणि वाहकांना वाट पाहावी लागत आहे. प्रवासी देखील तासनतास बसस्टँडवर बसची वाट पाहत असतात. खासगी वाहनांचे तिकीट दर वाढले असले तरी प्रवाशांना नाईलाजाने त्यांच्याकडेच जावे लागत आहे.
यांत्रिकांचीही वानवा
अहेरी आगारात एकूण ८६ बसेस वाहने आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी व देखभालीसाठी ७४ यांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत.
परंतु आजच्या स्थितीत अहेरी आगारात केवळ २६ यांत्रिक कर्मचारीच आहेत. ६० यांत्रिकी कर्मचाऱ्यांची पदे रिकामी आहेत.
पावसाळ्यानंतरही रस्त्यांची दैनावस्था कायम
- पावसाळ्यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती करणे शक्य नाही. असे बांधकाम विभागाकडून सांगितले जात हाेते. आता मात्र पावसाळा संपला आहे. तरीही रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही.
- अहेरीवरून सिराेंचासाठी दिवसातून एकाच बसच्या दाेन फेऱ्या हाेत हाेत्या,आता केवळ एकच फेरी हाेते. दाेन फेऱ्यांसाठी जेवढा वेळ लागते तेवढाच वेळ आता एकाच फेरीसाठी लागत असल्याने अधिक प्रमाणात डिझेल लागते. त्यामुळे एसटीचा ताेटा वाढत चालला आहे.
डिझेलचा खर्चही भरून निघणे कठीण
रत्यांच्या दुरवस्थेमुळे एसटीची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे. इच्छित स्थळी पाेहाेचण्यासाठी आता दुप्पट कालावधी लागत आहे. तेवढा वेळ बस सुरूच राहत असल्याने दुप्पट डिझेल लागत आहे. प्रवासी मात्र तेवढेच मिळत असल्याने उत्पन्नात वाढ झाली नाही. परिणामी आगाराचा ताेटा वाढत चालला आहे.
बस वेळेवर कशी पाेहाेचणार?
अहेरी आगारात मानव विकास मिशनच्या एकून ४२ बसेस आहेत. यातील बहुतांश बसेस दरराेज विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी साेडल्या जातात. मात्र रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट असल्याने बस पाेहाेचण्यास उशीर हाेतो. बस आगारात आल्यानंतर तिची हमखास दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे पुन्हा उशीर हाेते. त्यातच काही वेळेला साहित्य राहत नाही. परिणामी बस आगारातच उभी ठेवावी लागते.