लॉकडाऊनमध्येही त्यांची जडली पुस्तकांशी मैत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:00 AM2020-05-22T05:00:00+5:302020-05-22T05:00:49+5:30
कोयनगुडा गावात मार्च २०२० मध्ये देवराई आर्ट व्हिलेज व कोयनगुडा जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने देवराई ग्रामग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. लोकसहभागातून जवळपास ८०० पुस्तके या ग्रंथालयाला प्राप्त झाली. लॉकडाऊनच्या कालावधीत या ग्रंथालयात सदुपयोग होत असल्याचे दिसून येत आहे.
रमेश मारगोनवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : लॉकडाऊनमुळे शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आलीत. पुढील शैक्षणिक सत्रात शाळा, महाविद्यालये नेमकी कधी सुरू होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण द्यावे, असे निर्देश शिक्षकांना दिले आहेत. मात्र भामरागड तालुक्यातील गरीब पालकांकडे स्मार्टफोन सापडणे कठीणच. अशा परिस्थितीत कोयनगुडा जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची आवड निर्माण केल्याने लॉकडाऊनच्या कालावधीतही विद्यार्थी पुस्तकं वाचनाचा छंद जोपासत आहेत.
कोयनगुडा गावात मार्च २०२० मध्ये देवराई आर्ट व्हिलेज व कोयनगुडा जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने देवराई ग्रामग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. लोकसहभागातून जवळपास ८०० पुस्तके या ग्रंथालयाला प्राप्त झाली. लॉकडाऊनच्या कालावधीत या ग्रंथालयात सदुपयोग होत असल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाऊनमुळे बाहेरगावी शिकणारे विद्यार्थी गावातच थांबले आहेत. स्थानिक नागरिकांनाही काम उरले नाही. तसेच जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचीही शाळा लवकरच बंद झाली. त्यामुळे गावातील नागरिक व शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करीत असल्याचे दिसून येते.
मुलांनी आतापर्यंत केले ५० पुस्तकांचे वाचन
दररोज सायंकाळी ६ ते ८ या कालावधीत वाचनालय उघडले जाते. गावातील सुशिक्षित तरुणी शशी मडावी ग्रंथालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहे. कोयनगुडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विनित पद्मावार व सहशिक्षक व वसंत इष्टाम यांनी जवळपास ३०० पुस्तके वाचनालयाला उपलब्ध करून दिली. देवराई आर्ट व्हिलेजचे संस्थापक सुरेश पुंगाटी यांनीही काही पुस्तके ग्रंथालयासाठी दिली. लॉकडाऊनच्या कालावधीत जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी जवळपास ५० पुस्तकांचे वाचन करून त्यातून टिपण्या काढल्या आहेत.