साधारण परिस्थितीतही ‘त्या’ बनल्या माेठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:34 AM2021-03-08T04:34:39+5:302021-03-08T04:34:39+5:30
गडचिरोली जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी ग्रामपंचायतमध्ये बेबीताई बुरांडे ह्या दाेनदा निवडून आल्या. २०१५- २०२० या काळात वाॅर्ड क्र.१ ...
गडचिरोली जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी ग्रामपंचायतमध्ये बेबीताई बुरांडे ह्या दाेनदा निवडून आल्या. २०१५- २०२० या काळात वाॅर्ड क्र.१ मधून त्या निवडून आल्या. तेथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात झाली. अतिशय शांत, संयमी व मनमिळावू स्वभाव असल्याने त्यांनी पाच वर्षात नागरिकांची मने जिंकली. फेब्रुवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या ग्रा.पं. निवडणुकीत वाॅर्ड क्र. ५ मधून त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या व सरपंचपदी विराजमान सुद्धा झाल्या. आष्टीसारख्या माेठ्या ग्रामपंचायतचे सरपंचपद सर्वसामान्य घरच्या महिलेने भूषविणे ही इतर महिलांसाठीही प्रेरणादायी व अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे, बेबीताई बुरांडे यांचे माहेर चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील आहे. वडील वसंतराव सातपुते हे १५ वर्ष गावचे सरपंच होते. त्यानंतर जि.प.सदस्य पद त्यांनी भूषविले. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना राजकीय वारसा लाभला होता. विवाहानंतर आष्टी येथे शारदा महिला मंडळाचे सचिवपद भूषवितानाच त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. त्यानंतर आता थेट आष्टीसारख्या मोठ्या गावच्या सरपंच पदावर विराजमान झाल्या. आपण आष्टीच्या सरपंच होऊ असा स्वप्नातही विचार केला नव्हता, असे त्या आनंदाने सांगतात मात्र, त्यांच्या उच्चारासह डाेळ्यात अश्रुरूपी भावनिकताही दिसून येते.