अखेर यंत्रणेकडून वृक्ष लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:02 AM2019-07-22T00:02:09+5:302019-07-22T00:02:56+5:30
वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले, रोपही आणले, मात्र वृक्ष लागवड न केल्याने रोपे सडून गेली होती. या प्रकाराबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर सामाजिक वनिकरण विभागाने हालचाली करून कर्मचारी व मजुरांमार्फत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले, रोपही आणले, मात्र वृक्ष लागवड न केल्याने रोपे सडून गेली होती. या प्रकाराबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर सामाजिक वनिकरण विभागाने हालचाली करून कर्मचारी व मजुरांमार्फत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली.
३३ कोटी वृक्ष लागवड मोहीमेंतर्गत सामाजिक वनिकरण विभागाने वैरागड-कढोली मार्गावर पाटणवाडा-कराडी गावादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यासाठी रोपटे आणले. मात्र वृक्ष लागवड न केल्याने हे रोप सडून गेले होते. याबाबत लोकमतने १७ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले. सदर वृत्ताची दखल घेऊन चौकशी करण्यात आली. यात सत्यता आढळल्याने रोपे लावण्यात आली.
सामाजिक वनिकरण विभागाकडे वन परिक्षेत्राचा भार जास्त येत असल्याने वृक्ष लागवड मोहिमेदरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात वृक्ष लागवड व्हावी, रोपांची हानी होऊ नये, यासाठी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करून मजुरांकरवी वृक्ष लागवड केली जाते. मात्र रोजंदारी तत्वावर नेमलेल्या चौकीदाराने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने पाटणवाडा-कराडी गावादरम्यान वृक्ष लागवडीसाठी खोदलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण झाले नाही. परिणामी लागवडीसाठी आणलेली रोपे करपून गेली. दरम्यान लोकमतने १७ जुलैच्या अंकात ‘रस्त्याच्या कडेला रोप फेकले’ अशा मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून सामाजिक वनिकरण विभागाचा भोंगळ कारभार उजेडात आणला. त्यानंतर सामाजिक वनिकरण विभाग गडचिरोलीच्या उपवनसंरक्षकांनी १७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मोका चौकशी केली. या चौकशीत लोकमतच्या वृत्ताची सत्यता सिध्द झाली. लगेच विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन खोदलेल्या खड्ड्यात नवीन रोप आणून वृक्षारोपण करण्यात आली. लावलेली सर्व रोपे जीवंत आहेत.