अखेर वायगाव जि.प. शाळेची इमारत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 01:06 AM2019-02-03T01:06:58+5:302019-02-03T01:08:10+5:30
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येनापूर केंद्रातील वायगाव येथील जि.प. शाळेला जि.प. सदस्या शिल्पा रॉय यांनी महिनाभरापूर्वी भेट देऊन शाळा इमारतीची पाहणी केली होती. जीर्णावस्थेत असलेल्या या शाळा इमारतीची प्रशासनाने दुरूस्ती करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येनापूर केंद्रातील वायगाव येथील जि.प. शाळेला जि.प. सदस्या शिल्पा रॉय यांनी महिनाभरापूर्वी भेट देऊन शाळा इमारतीची पाहणी केली होती. जीर्णावस्थेत असलेल्या या शाळा इमारतीची प्रशासनाने दुरूस्ती करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली होती. मात्र प्रशासनाने या बाबीकडे दुर्लक्ष केले. २५ जानेवारीच्या रात्री इमारतीचे कवेलु व छत कोसळून मोठे नुकसान झाले आहे.
वायगाव जि.प. शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिकण्याची सुविधा आहे. या शाळेत ५८ विद्यार्थी शिक्षण घेत असून ही दोन शिक्षकी शाळा आहे. सदर शाळेची इमारत कवेलूच्या छताची आहे. पावसापासून या इमारतीचा बचाव व्हावा, यासाठी ताडपत्रीचा आधार घेण्यात आला होता. मात्र अवकाळी पावसाने सदर इमारत कोसळली. ही घटना रात्रीच्या सुमारास झाल्याने येथे जीवितहानी टळली. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी जि.प. सदस्य शिल्पा रॉय यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. विद्यार्थी ताडपत्रीच्या छताखाली ज्ञानाचे धडे घेत असल्याचे दिसून आले. या संदर्भात लोकमतनेही वृत्त प्रकाशित करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र सदर शाळा इमारतीच्या निर्लेखन प्रस्तावाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. परिणामी ही शाळा इमारत कोसळली. जिल्ह्यातील अनेक शाळा इमारतींची दुरवस्था आहे. शाळांकडून दरवर्षी शाळा कृती आराखडा, वर्गखोल्यांची संख्या आदींची माहिती विहीत नमुन्यात प्रपत्रात तालुका व जिल्हा प्रशासनाकडे सादर केली जाते. शाळा इमारतीच्या अवस्थेबाबत संपूर्ण माहिती असूनही जि.प.च्या शिक्षण विभागाने निर्लेखनाच्या कार्यवाहीकडे दुर्लक्ष केले आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने वायगाव येथे नवीन शाळा इमारतीचे बांधकाम करावे, अशी मागणी जि.प. सदस्य शिल्पा रॉय यांनी केली आहे. भेटीदरम्यान धर्मराज रॉय, विनोद गौरकार, पं.स. सदस्य वंदना गौरकार आदी उपस्थित होते.