जिल्हा गोदरीमुक्तीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:40 AM2017-12-03T00:40:24+5:302017-12-03T00:42:36+5:30
जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १०० टक्के शौचालय बांधून जिल्हा गोदरीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १०० टक्के शौचालय बांधून जिल्हा गोदरीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मार्च २०१८ पर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्हा गोदरीमुक्त होण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेसह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने स्थानिक सांस्कृतिक भवनात जि. प. सदस्य, पं. स. सभापती, सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.च्या अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जवळीकर, युनीसेफचे देशपांडे, डीआरडीएचे प्रकल्प संचालक पठाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पालकमंत्री आत्राम म्हणाले, स्वच्छ भारत मिशनच्या शौचालय बांधकामात पारदर्शकता असली पाहिजे, जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतीपैकी २२७ ग्रा.पं. शासनाने हागणदारीमुक्त घोषित केले आहेत. २२९ ग्रा.पं. गोदरीमुक्त होणे शिल्लक असून यामध्ये ४४ हजार २५६ वैयक्तिक शौचालय बांधकाम करावयाचे आहे, असे त्यांनी सांगितले. जि. प. अध्यक्ष भांडेकर म्हणाल्या, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाच्या योजनेची माहिती दुर्गम भागापर्यंत पोहोचली पाहिजे, जिल्हा गोदरीमुक्त होण्यासाठी जिल्हाभर चळवळ उभी राहिली पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे सांगितले. प्रास्ताविक जि.प. सीईओ शांतनू गोयल, संचालन योगेश ठुसे यांनी केले तर आभार अतिरिक्त सीईओ राजकुमार पुराम यांनी मानले.
शाळा स्टिकर व घडीपत्रिकेचे विमोचन
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय निर्मितीतून गडचिरोली जिल्हा गोदरीमुक्त करण्याच्या जनजागृतीसाठी सर्व जि.प. शाळांना स्टिकर व ब्रोशर पुरविण्यात येणार आहे. शिवाय आशा स्वयंसेविका व महिला बचतगटाच्या पदाधिकारी व सदस्यांना जनजागृतीसाठी घडीपत्रिका पुरविण्यात येणार आहे. सदर स्टिकर, ब्रोशर व घडी पत्रिका जि.प. प्रशासनाने प्रकाशित केले आहे. या स्टिकर व घडीपत्रिकांचे विमोचन सदर कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्टिकर व घडी पत्रिकांमध्ये शौचालय वापराचे अनेक फायदे नमूद करण्यात आले आहे.
२०० सरपंचांची हजेरी
शौचालय निर्मितीतून गोदरीमुक्तीसाठी घेण्यात आलेल्या या कार्यशाळेला सन २०१७-१८ च्या वार्षिक कृती आराखड्यात समाविष्ट असलेल्या २०० ग्रा.पं. च्या सरपंच व उपसरपंचांनी हजेरी लावली होती.
स्वच्छतेवरील निबंध व लघुपट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
स्वच्छ भारत मिशन जि. प. गडचिरोलीच्या वतीने ‘स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिद्धी’ अंतर्गत स्वच्छतेच्या विषयावर जिल्हास्तरीय निबंध व लघुपट स्पर्धा घेण्यात आली. १८ वर्षाखालील गटातून निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक यशश्री मनोहर प्रधान, द्वितीय क्रमांक नीलेश वसंता आवारी तर तृतीय क्रमांक निकिता छत्रशाल क्षिरसागर यांनी पटकाविला. १८ वर्षाखालील गटात विशाखा वाढणकर हिने प्रथम, करिष्मा राखुंडे द्वितीय तर अरविंद टेंभूर्णे याने तृतीय क्रमांक पटकाविला. लघुपट स्पर्धेत १८ वर्षाखालील गटातून कृष्णा रघुवंशी तर १८ वर्षावरील गटातून महेश नीलम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. निबंध स्पर्धेतील प्रथम विजेत्यास १५ हजार, द्वितीय विजेत्यास १० हजार व तृतीय विजेत्यास पाच हजारांचा धनादेश व शिल्ड, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. लघुपट स्पर्धेतील दोन्ही विजेत्यांना प्रत्येकी १५ हजार रूपयांचा धनादेश, शिल्ड, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धकांचे पालकही उपस्थित होते.