पावसाच्या सरीने साऱ्यांनाच आनंद; पेरणीत बळीराजा हाेई दंग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2023 09:58 PM2023-06-28T21:58:15+5:302023-06-28T21:58:42+5:30
Gadchiroli News गेल्या पंधरवड्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना २६ जून राेजी दुपारपासून आलेल्या दमदार पावसाने दिलासा मिळाला. नदी, नाले भरून वाहिले. रोहिणी, मृग हे पावसाचे नक्षत्र कोरडे गेल्याने चिंतेत असलेला बळीराजा पावसाने आनंदला.
गडचिरोली : गेल्या पंधरवड्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना २६ जून राेजी दुपारपासून आलेल्या दमदार पावसाने दिलासा मिळाला. नदी, नाले भरून वाहिले. रोहिणी, मृग हे पावसाचे नक्षत्र कोरडे गेल्याने चिंतेत असलेला बळीराजा पावसाने आनंदला. असहाय उकाड्यापासून नागरिकांना सुटका मिळाल्याने साऱ्यांनाच आनंद झाला. तसेच खरीप पेरणीयोग्य पाऊस आल्याने आता खरिपाच्या पेरणीला वेग येईल.
मागील वर्षातील पावसात सगळे खरीप हंगाम अगदी वेळेवर झाले होते. नदी, नाले तुडुंब हाेते. शेतकऱ्यांना अवर्षणाचा सामना करावा लागला नाही. मागच्या वर्षात सरासरी पावसापेक्षा अधिक पाऊस झाला. हवामान बदलाचा परिणाम व धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वगळता भरपूर उत्पन्न झाले होते; शेवटही पाऊस चांगला बरसल्याने त्या पावसाचा फायदा रबी पिकाला होऊन रबी पिकाचे उत्पन्न बऱ्यापैकी झाले होते. यावर्षी ही स्थिती राहिल्यास शेतकरी चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा बाळगू शकताे.
‘ते’ शेतकरी लागतील राेवणीला
वैरागड परिसरात सिंचनाची साेय असलेल्या शेतकऱ्यांचे धान पऱ्हे लावणी योग्य झाले आहेत. येत्या चार-पाच दिवसांत धान रोवणीला सुरुवातदेखील हाेईल. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची साेय नाही. त्या शेतकऱ्यांनी अद्याप धान पऱ्हे टाकले नाहीत. त्यामुळे नुकत्याच आलेल्या समाधानकारक पावसाने आता चार-पाच दिवसांत उसंत घेतल्यास जमीन नांगरून या वर्षात देखील वेळेवर खरिपाचा हंगाम होण्याची शक्यता आहे.