ब्रिटिशांच्या स्थापत्यकलेची साक्ष कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 05:00 AM2020-08-27T05:00:00+5:302020-08-27T05:01:02+5:30
एटापल्लीपासून तोडसा पेठा गावापुढे बांदे नदीवर आणि आष्टी तालुक्यातील चंद्रपूर मार्गावर असलेल्या वैनगंगा नदीवरील पूल खूप जुना आहे. याशिवाय भामरागडच्या पर्लकोटा नदीवरील पूलही जुना आहे. पण हे पूल ब्रिटीशकालीन नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. जिल्ह्यात एकही ब्रिटीशकालीन पूल नसल्याची माहिती अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागात तालुक्यांमध्ये इंग्रजांच्या आठवणी जपणाऱ्या अनेक गोष्टी आजही शाबूत आहेत. त्या काळात जिल्ह्याचे ठिकाण असणाऱ्या सिरोंचा येथे तर आजही अनेक सरकारी कार्यालयांचा कारभार इंग्रजांनी बांधलेल्या इमारतींमधून चालतो. त्यांची ती स्थापत्यकला आणि कामांचा दर्जा आताच्या यंत्रणेसाठी दिशादर्शक ठरू शकतो.
एटापल्लीपासून तोडसा पेठा गावापुढे बांदे नदीवर आणि आष्टी तालुक्यातील चंद्रपूर मार्गावर असलेल्या वैनगंगा नदीवरील पूल खूप जुना आहे. याशिवाय भामरागडच्या पर्लकोटा नदीवरील पूलही जुना आहे. पण हे पूल ब्रिटीशकालीन नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. जिल्ह्यात एकही ब्रिटीशकालीन पूल नसल्याची माहिती अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड यांनी दिली.
सिरोंचा येथील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती कार्यालय आजही ब्रिटीशकालीन इमारतीत आहेत. चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे असलेली विश्राम गृहाची इमारत आजही सुस्थितीत आहे. पण त्याची देखभाल नसल्यामुळे हे विश्रामगृह थोडे अडगळीत पडले आहे. त्या काळात येथे इंग्रजांना नियमित राबता होता. आता ही वास्तू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. सदर इमारतीची चांगली देखभाल केल्यास पर्यटकांना निवासासाठी चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
स्वातंत्र्यानंतर पाऊणशे वर्षाकडे वाटचाल सुरू असताना ब्रिटिशांच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात बांधल्या गेलेल्या वास्तूंवर हा प्रकाशझोत. ब्रिटिशांनी बांधलेल्या अनेक इमारती, आजही भक्कम स्थितीत आहेत. कित्येक वास्तूंनी तर वयाची शंभरीही ओलांडली आहे. आजही अनेक वास्तू वापरात असून कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची साक्ष देत आहेत. या वास्तू सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी दिशादर्शक ठरल्या आहेत.
पर्जन्यमापक टॉवर
तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्याच्या पूर्व टोकावरील एकमेव पर्जन्यमापक टॉवर सिरोंचा येथे होता. तेथून दक्षिणेकडील भागातील पर्जन्यस्थितीचा अंदाज घेतला जात होता. अलीकडच्या १५ वर्षात मात्र तो बंद पडला. त्याच्या सभोवती असणारे तारेचे कुंपन, दरवाजे, खिडक्या लोकांनी काढून नेल्या. त्या टॉवरवर असणारे दिशादर्शक यंत्र अनेकांसाठी आकर्षण होते. विशेष म्हणजे त्या काळात सिरोंचा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी इंग्रजांनी निर्माण केलेल्या अनेक गोष्टी आजही दिसतात. हा पर्जन्यमापक टॉवर सोडल्यास इतर सर्व इमारतींचा आजही वापर होत आहे.
सिरोंचातील विश्रामगृह
सिरोंचा येथील ब्रिटीशकालीन विश्रामगृह आजही तेथे जाणाऱ्याला भुरळ पाडते. या विश्रामगृहाची इमारत आजही पूर्णपणे सुस्थितीत आहे. त्यामुळे अनेक व्हीआयपी सिरोंचात मुक्कामी राहण्यासाठी आजही या विश्रामगृहाचा वापर करतात. या दुमजली विश्रामगृहातील व्हीआयपी सूट मोठ्या हॉटेलमधील सूटप्रमाणे आहे. जवळूनच वाहणारी प्राणहिता नदी, नारळाची झाडे असा देखावा मनाला आल्हाददायक वाटतो. ब्रिटीश काळात इंग्रजांनी स्वत:च्या विश्रामासाठी हे विश्रामगृह बांधले होते.
पोलीस स्टेशन इमारत
धानोरा येथील पोलीस स्टेशनची दगडी इमारत आजही सुस्थितीत आहे. विशेष म्हणजे इंग्रजांच्या काळापासून याच इमारतीत पोलीस स्टेशन आहे. ही मजबूत इमारत आजही भक्कपणे उभी आहे. फक्त आधी त्यावर कवेलू होते. आता लोखंडी टिन टाकले आहेत.
मुलचेरातील विश्रामगृह
आष्टीप्रमाणेच मुलचेरा येथेही इंग्रजांनी विश्रामगृह बांधले आहे. हे विश्रामगृह आधी वनविभागाच्या ताब्यात होते. आता त्याची देखभाल वनविभागास महामंडळाकडे आहे. जंगलात फेरफटका मारल्यानंतर इंग्रज आराम करीत.
आष्टीतील डाकघर
3तत्कालीन काळात चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे डाक घर होते. ब्रिटीशांचा काळ संपल्यानंतर अहेरीचे राजे श्रीमंत धर्मराव महाराज यांच्याकडे त्याचा ताबा होता. आता तिथे केवळ एक भिंत असून त्यावर ेवेली वाढल्या आहेत.