माओवादग्रस्त भागात हेलिकॉप्टरने ईव्हीएम रवाना, ६८ केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट
By संजय तिपाले | Published: April 16, 2024 03:04 PM2024-04-16T15:04:35+5:302024-04-16T15:05:27+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला होऊ घातलेल्या गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघातील माओवादग्रस्त भागातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास १६ एप्रिलला सुरूवात करण्यात आली.
- संजय तिपाले
गडचिरोली - पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला होऊ घातलेल्या गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघातील माओवादग्रस्त भागातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास १६ एप्रिलला सुरूवात करण्यात आली. ६८ केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरने ईव्हीएम व इतर साहित्यासह पोहोच करण्यात आले.
राज्यातील सर्वात अतिसंवेदनशील मतदारसंघ असलेल्या गडचिरोली-चिमूरमध्ये निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. छत्तीसगड व तेलंगणा सीमेवरील विविध संवेदनशील व अतिसंवेदनशील अशा ६८ मतदान केंद्रांवरील ७२ निवडणूक पथकाच्या २९५ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह १६ रोजी सकाळी भारतीय वायूसेना आणि भारतीय लष्कराच्या ३, एम.आय. १७ आणि ४ ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचिविण्यात आले. या लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रात मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित ठिकाणी पोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांत योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत.