विकासकामे मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 01:03 AM2018-09-16T01:03:02+5:302018-09-16T01:04:40+5:30
ठाणेगावचा कायापालट करण्यासाठी आपण सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत या गावाची निवड केली. सदर गावात विविध योजनेतून अनेक विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : ठाणेगावचा कायापालट करण्यासाठी आपण सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत या गावाची निवड केली. सदर गावात विविध योजनेतून अनेक विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. सदर विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी दिले.
सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत ठाणेगाव येथे स्वच्छता अभियानाचा शुभारंभ खा. नेते यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी मंचावर आरमोरी पं. स. चे सहायक संवर्ग विकास अधिकारी कोमलवार, सरपंच नीता मडावी, भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, सदानंद कुथे, तालुका महामंत्री गोपाल भांडेकर, पंचायत विस्तार अधिकारी परसा, शिक्षणाधिकारी लालाजी कुकुडकर, जि. प. सदस्य मितलेश्वरी खोब्रागडे, पोलीस निरीक्षक अजित राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी खा. अशोक नेते म्हणाले, ठाणेगावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण हे गाव दत्तक घेतले असून या गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे सांगितले. गावात मंजूर झालेल्या तलाठी इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे, याशिवाय डाक कार्यालय, ग्राम पंचायत भवन, स्मशानभूमी शेड बांधकाम, रस्ता खडीकरण आदी कामे प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय ग्राम पंचायतींतर्गत वाढीव नळ पाणीपुरवठा योजना, शेतकऱ्यांना कृषी वीज पंपाची जोडणी, कृषी गोदाम, क्रीडांगणाची उभारणी, व्यायाम शाळा, सार्वजनिक वाचनालय, आरोग्य उपकेंद्रात प्रसूतीगृह, उपकेंद्राला संरक्षण भिंत, सीसी रोड, जि. प. शाळांमध्ये आवश्यक त्या भौतिक सुविधा आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत, अशी माहिती खा. नेते यांनी दिली.
बौद्ध समाजासाठी सभागृह, समाजमंदिर, शीतगृह, वनीकरण तसेच कौशल्य योजनेंतर्गत प्रशिक्षण व इतर विकास कामांचा आढावा खा. नेते यांनी यावेळी घेतला. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ हजर होते.