शिक्षक पदासाठी आता परीक्षा
By admin | Published: June 5, 2017 12:36 AM2017-06-05T00:36:59+5:302017-06-05T00:36:59+5:30
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित व अनुदानास पात्र ठरलेल्या तसेच पात्र घोषीत झालेल्या शाळांमध्ये शिक्षक सेवकाची भरती आता परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.
गुणांच्या आधारे होणार निवड : राज्य शासनाच्या हालचाली वाढल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित व अनुदानास पात्र ठरलेल्या तसेच पात्र घोषीत झालेल्या शाळांमध्ये शिक्षक सेवकाची भरती आता परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. अभियोग्यता व बुध्दीमता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांची शिक्षक पदावर निवड होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या दृष्टीने राज्य शासनाने हालचाली वाढविल्या आहेत.
शिक्षक पदभरतीसाठी परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. गुणवत्तेवर शिक्षकांची निवड व्हावी, यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. सदर परीक्षा २०० गुणांची राहणार असून शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार या परीक्षेस अर्ज करण्यास पात्र राहतील. एका उमेदवारास शिक्षक पदासाठीची अभियोग्यता चाचणी देण्याची संधी पाचवेळा मिळणार आहे. राज्यातील शिक्षक सेवकांच्या रिक्त पदांची माहिती ही विषय, प्रवर्ग, माध्यम व बिंदू नामावलीनुसार ‘मदत’ या संगणकीय प्रणालीद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षक भरती प्रक्रियेतील अनुचित हस्तक्षेपाला आळा बसणार आहे. गुणवंत व पात्र विद्यार्थ्यांची या परीक्षेतून शिक्षकपदी आता निवड होणार आहे.
संस्थेची मक्तेदारी संपणार
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये शिक्षक सेवक भरतीसाठी केंद्रीय भरतीपूर्व निवड चाचणी घेण्यात येत होती. मात्र अनुदानित खासगी शाळांमध्ये शिक्षक पदभरतीसाठी परीक्षा घेतली जात नव्हती. या निर्णयामुळे संस्थेची मक्तेदारी संपणार आहे.