३४ बोअरवेलचे खोदकाम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:00 AM2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:00:36+5:30
अहेरी शहरात १७ प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार प्रशासनामार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु उन्हाळ्यात काही वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्याकरिता प्रशासनाच्या वतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ४२ लाख रूपये मंजूर करण्यात आले. या निधीतून १७ प्रभागांमध्ये विविध ठिकाणी एकूण ३४ बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : शहरातील विविध भागात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होत असे. नागरिक सकाळपासूनच जलस्त्रोतांवर पाण्याकरिता गर्दी करायचे. पाणी संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नगर पंचायतीच्या वतीने शहरातील विविध वॉर्डात एकूण ३४ बोअरवेलच्या खोदकामास सुरूवात झाली आहे. ४२ लाख रूपयांच्या खर्चातून नागरिकांसाठी ही सुविधा करण्यात येत आहे.
अहेरी शहरात १७ प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार प्रशासनामार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु उन्हाळ्यात काही वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्याकरिता प्रशासनाच्या वतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ४२ लाख रूपये मंजूर करण्यात आले. या निधीतून १७ प्रभागांमध्ये विविध ठिकाणी एकूण ३४ बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे. गेल्या आठ दिवसांत २० बोअरवेलचे खोदकाम झाले. उर्वरित बोअरवेलचे खोदकाम आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. एकाचवेळी संपूर्ण शहरातील विविध भागात एवढ्या संख्येने बोअरवेलचे खोदकाम करणारी अहेरी ही राज्यातील पहिलीच नगर पंचायत आहे.
१७ प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी दोन बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे. नगर पंचायत हद्दीत समाविष्ट असलेल्या गडअहेरी, गडबामणी, चेरपल्ली आदी तिन्ही गावात दरवर्षी पाणी टंचाई निर्माण व्हायची. फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागायचे. येथील नागरिकांना गावालगतच्या नाल्यावरून पाणी आणावे लागत असे. अनेक दिवसांपासून नागरिकांनी बोअरवेल खोदकाम करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन या ठिकाणी बोअरवेलचे खोदकाम होत असल्याने नागरिकांची पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
अहेरी शहरातील अनेक वॉर्डांमध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण व्हायची. पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने अनेक दिवसांपासून पुढाकार घेतला. परंतु पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने अनेक महत्त्वपूर्ण विषयांवरील कामे रखडली. अनेक कामे विचाराधीन आहेत. परंतु आता शहरातील मूलभूत समस्या प्राधान्याने लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न राहिल.
- हर्षा ठाकरे, नगराध्यक्ष, नगर पंचायत अहेरी