खाेदकामामुळे वाहतुकीची काेंडी, रहदारीची समस्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:51 AM2021-02-26T04:51:21+5:302021-02-26T04:51:21+5:30
चामाेर्शी शहरातील लक्ष्मी गेट ते मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावरून वाहनांची तसेच पादचाऱ्यांची गर्दी असते. आठवडी बाजाराच्या दिवशी तर अनेकदा ...
चामाेर्शी शहरातील लक्ष्मी गेट ते मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावरून वाहनांची तसेच पादचाऱ्यांची गर्दी असते. आठवडी बाजाराच्या दिवशी तर अनेकदा वाहतूक काेंडीच्या समस्येचा सामना नागरिकांना करावा लागताे. मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावर व बालोउद्यानच्या बाजूने गेलेली नाली अनेक दिवसांपासून खोदून ठेवली आहे. परंतु अद्यापही बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला नाही. खाेदकाम केलेल्या बाजूला टिनाचे पत्रे लावून ठेवण्यात आले आहेत. परंतु बाहेरुन येणाऱ्या अथवा अनभिज्ञ असलेल्या नागरिकांची येथे दिशाभूल हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर उजव्या बाजूला टेलिफोन वायरिंग बॉक्स बसविला आहे. अपघात होऊ नये म्हणून टिनपत्रे लावण्यात आली आहेत, परंतु हा यावरील उपाय नव्हे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मुख्य हायवे मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असल्याने व एकेरी वाहतूक आहे. राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी वाहतूक तसेच बाजारपेठ मार्गालगत नालीसाठी खाेदकाम यामुळे येथे वारंवार वाहतुकीची काेंडी हाेते. बाजारच्या दिवशी अनेक दुकानदार रस्त्यालगत विविध वस्तू विक्रीची दुकाने लावतात. याच रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहने तसेच नागरिक पायी जात असतात. त्यामुळे पुन्हा वाहतूक ठप्प होते. स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून नालीचे बांधकाम न केल्यास येथे गंभीर अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शक्यता नागरिक वर्तवित आहेत.
बाॅक्स
नगरपंचायतने नियाेजन करण्याची मागणी
चामाेर्शी शहरात दर गुरूवारी आठवडी बाजार भरताे. या दिवशी भाजीपाला, फळे व विविध वस्तु विक्रेते मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बसतात. याच मार्गाने ट्रक, टेम्पो, पिकअप व अन्य वाहने ये-जा करीत असतात.याशिवाय नागरिकांचीही वर्दळ असते. वाहतुकीची काेंडी हाेऊ नये म्हणून नगरपंचायत प्रशासनाने उपाययाेजना किंवा याेग्य नियाेजन करावे, अशी मागणी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद खोबे, कॉग्रेसचे जिल्हा महासचिव कालिदास बुरांडे व नागरिकांनी केली आहे.