दारुबंदीच्या जिल्ह्यात चक्क रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक, दोन वाहनं जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 07:41 PM2019-03-28T19:41:06+5:302019-03-28T19:41:40+5:30
एका कारसह रुग्णवाहिकेमधून देशी दारूची वाहतूक करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी सकाळी उघडकीस आणला. सदर दोन्ही वाहने आणि त्यातील दिड लाखांची दारू जप्त करण्यात आली.
गडचिरोली : एका कारसह रुग्णवाहिकेमधून देशी दारूची वाहतूक करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी सकाळी उघडकीस आणला. सदर दोन्ही वाहने आणि त्यातील दिड लाखांची दारू जप्त करण्यात आली.
सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने विक्रेत्यांकडून चोरट्या मार्गाने इतर जिल्ह्यातून दारूची आयात केली जात आहे. एका वाहनातून दारू येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पंचांसह खासगी वाहनाने शंकरपूर-मोहगाव मार्गावर पाळत ठेवली असता पहाटेच्या सुमारास एक रुग्णवाहिका (एमएच ३५-५२१५) येताना दिसली. संशय वाटल्याने त्या वाहनाला मोहगाव फाटा येथे अडवून झडती घेतली असता त्यात सुपर सॉनिक रॉकेट संत्रा या ब्रॅन्डच्या ९० मिलीच्या ५८ पेट्या (४८०० बाटल्या) आढळल्या. त्यांची किंमत १ लाख २४ हजार ८०० रुपये आहे. याशिवाय 2 लाख 50 हजार किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले.
याच दरम्यान केलेल्या दुसऱ्या कारवाईत विठ्ठलगाव-पोटेगाव मार्गावर एमएच ४०, ए १६३ ही कार संशयितपणे येताना आढळली. त्या वाहनाची विठ्ठलगावजवळ झडती घेतली असता त्यात सुपर सॉनिक रॉकेट संत्रा या ब्रॅन्डच्या ९० मिलीच्या ८ पेट्या (८०० बाटल्या) आढळल्या. त्यांची किंमत २० हजार ८०० आहे. शिवाय वाहन (किंमत ७० हजार ८००) जप्त करण्यात आली.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक हारून शेख, सहायक दु.नि. जी.पी. गजभिये, एस.एम.गव्हारे, व्ही.पी.शेंदरे, व्ही.पी.महाकुलकर यांनी केली.