तीन माता मृत्यूने खळबळ, मंत्री धर्मरावबाबांनी साधला रुग्णांशी संवाद
By संजय तिपाले | Published: October 5, 2023 05:04 PM2023-10-05T17:04:42+5:302023-10-05T17:06:21+5:30
महिला, बाल रुग्णालयास भेट: सुविधांचा घेतला आढावा
गडचिरोली : एकाच आठवड्यात तीन मातांचा सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर आला. या घटनेची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी ५ ऑक्टोबरला दुपारी सव्वा चार वाजता येथील महिला व बाल रुग्णालयास भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णांशीही संवाद साधला.
महिला व बाल रुग्णालयात २४ सप्टेंबरला रजनी प्रकाश शेडमाके (२३, रा. भानसी, ता. सावली, जि. चंद्रपूर), उज्ज्वला नरेश बुरे (२२, रा. मुरखळा चक, ता. चामोर्शी ह. मु. इंदिरानगर, गडचिरोली) व वैशाली सत्यवान मेश्राम (२४, रा. आष्टी) या तिघी प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी तिघींची शस्त्रक्रियेद्वारे (सिझेरियन) प्रसूती करण्यात आली. मात्र, रजनी शेडमाके हिला ताप, दमा आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला, तर उज्ज्वला बुरे आणि वैशाली मेश्राम हिला ताप आणि अतिसाराची लागण झाली. प्रकृती खालावल्याने २७ सप्टेंबरला दोघींना जिल्हा व सामान्य रुग्णालयात हलविले, परंतु संध्याकाळी रजनी शेडमाके हिने उपचारादरम्यान प्राण सोडले, तर उज्ज्वला बुरे हिला नागपूरला नेताना वाटेतच मृत्यू झाला. नागपूर येथे उपचार सुरू असताना वैशाली मेश्रामचा ३ ऑक्टोबरच्या रात्री मृत्यू झाला. या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांनी उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला.
दरम्यान, मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे ५ ऑक्टोबरला जिल्हा दौऱ्यावर होते. धानोरा येथील नियोजित आढावा बैठक व कार्यकर्ता मेळावा आटोपून ते गडचिराेलीत दाखल झाले. यावेळी त्यांचा ताफा महिला व बाल रुग्णालयात वळाला. त्यामुळेे अधिकाऱ्यांची धांदल उडाली. यावेळी धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रसूती कक्ष, बालकक्षात जाऊन पाहणी केली. त्यानंतर काही रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. रुग्णांना सर्व त्या सुविधा द्या , कुठेही अडचणी येता कामा नये, कुठल्याही स्थितीत रुग्ण बरा होऊनच घरी परतला पाहिजे, यासाठी सर्व ते प्रयत्न करा, असे निर्देश मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, नाना नाकाडे समवेत होते.
प्रसूती सुखरुप, इन्फेक्शन कशामुळे याचा शोध सुरु
दरम्यान, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी तीन मातांच्या मृत्यूबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधीक्षक डॉ.माधुरी किलनाके यांच्याकडून माहिती घेतली. तिन्ही महिलांची सिझेरियन शस्त्रक्रिया सुखरुप झाली, पण अचानक तब्येत खालावली. इन्फेक्शन नेमके कशामुळे झाले, हे शाेधण्यासाठी डेथ ऑडिट केेले जात असून यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अधय्क्षतेखाली समिती गठीत केली आहे. याशिवाय उपसंचालक कार्यालय व पुणे येथील तज्ज्ञ आरोग्य पथकही स्वतंत्र चौकशी करत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.खंडाते व वैद्यकीय अधीक्षक डॉ.किलनाके यांनी दिली.