अर्थसंकल्पाने केला नागरिकांचा भ्रमनिराश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 11:37 PM2018-02-01T23:37:30+5:302018-02-01T23:39:44+5:30
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी एनडीए सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प गुरूवारी लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांनी स्वागत केले. मात्र विरोधकांनी हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नाही, केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी एनडीए सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प गुरूवारी लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांनी स्वागत केले. मात्र विरोधकांनी हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नाही, केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र लोकांचा या अर्थसंकल्पाने भ्रमनिराश केला, अशी प्रतिक्रिया विरोधी नेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
शेतकऱ्यांची फसवणूक करणारा अर्थसंकल्प - आ. विजय वडेट्टीवार
मागील वर्षी पावणे दोन कोटींच्या घोषणा करण्यात आल्या. त्याचा फायदा शेतकºयांना झाला नाही. त्यामुळे शेतकºयांच्या आत्महत्येत २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद दाखविण्यात आलेल्या असून कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार असून आकड्यांची जुमलेबाजी आहे. या अर्थसंकल्पात इंफ्रास्ट्रक्चरवर भर दिला. मात्र लघु व मध्यव उद्योगासाठी कमी प्रमाणात तरतूद करण्यात आल्याने रोजगार निर्मितीसाठी याचा उपयोग होणार नाही, परिणामी बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. सदर अर्थकसंल्प म्हणजे आकड्यांचा खेळ असून शेतकऱ्यांची फसवणूक करणारा आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा विधी मंडळातील काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
----------------------
लोकांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प- डॉ. नामदेव उसेंडी
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य व गरीब लोकांच्या हिताचा विचार करण्यात आला नाही. महागाई नियंत्रणात नाही, निवडणुका डोळ्यापुढे ठेवून उद्योगपतींचे हित जोपासणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात विशेष अशी तरतूद नाही. एकूणच लोकांची दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी व्यक्त केली.
----------------------
देशाला विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प - खा. अशोक नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वस्पर्शीय आहे. सदर अर्थसंकल्प सर्व समाजातील लोकांना व घटकांना पुढे नेणारा तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणारा आहे. एकूणच हा अर्थसंकल्प देशाला विकासाकडे नेणारा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते यांनी व्यक्त केली.
----------------------
शेतकरी व गोरगरीब जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प - अॅड. संदीप धाईत
आंतरराष्ट्रीय नाणे निधी व मुडीज यांच्या सारख्या आंतरराष्ट्रीय पत मानांकन संस्थेद्वारे करण्यात आलेल्या भारतीय विकास प्रवाहातील जनतेचा आर्थिक अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून श्रीमंत व गरीब यांच्यात वृंदावलेली आर्थिक दरी भयावह परिस्थिती गाठत असताना शासनाने दिलेला हा अर्थसंकल्प शेतकरी व गोरगरीब जनतेला दिलासा देणारा व आर्थिक प्रगती साधणारा आहे. मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय, छोटे-मोठे व्यापारी यांच्या आर्थिक परिस्थितीत भरीव सुधारणा करण्यासाठी शासनाने केलेला हा साजेसा असा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया कर सल्लागार अॅड. संदीप धाईत यांनी व्यक्त केली.
--------------------
अपेक्षा भंग करणारा अर्थसंकल्प- भाग्यश्री आत्राम
केंद्र सरकार गेल्या तीन वर्षात शेतकरी बेरोजगारांना केवळ गाजर दाखविण्याचे काम करीत आहे. या अर्थसंकल्पानेही सर्वांचा अपेक्षाभंग झाला आहे. सामान्य नागरिक, नोकरदारांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. सर्वांच्या खिशाला आणखी कात्री लावण्यासाठी सरकार सज्ज झाल्याचे चित्र या अर्थसंकल्पातून दिसते, अशी प्रतिक्रिया जि.प. च्या बांधकाम सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री आत्राम यांनी व्यक्त केली आहे.
---------------------
आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद नाही- अतुल गण्यारपवार
शेतकऱ्यांसाठी ज्या योजना सरकारने आखल्या आहेत. त्या योजना गरीब शेतकऱ्यांसाठी पूरक नाही. शेतमाल उत्पादनाला पाहिजे त्या प्रमाणात भाव देण्यात योग्य निर्णय शासनाने घेतला नाही. देशातील आदिवासी भागाच्या विकासाकरिता अर्थसंकल्पात विशेष तरतुद नाही. रोजगार निर्मिती युवक व महिलांच्या विकासासाठीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली नाही. अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य तथा चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांनी दिली आहे.
---------------------
बेरोजगारांचा अपेक्षाभंग करणारा बजेट - सतीश विधाते
सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना अनुसरून केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प नाही. शेषमध्ये १ टक्क्याची वाढ झाल्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर आणखी वाढणार आहेत. दोन कोटी नोकऱ्या देण्याचा दावा सरकारने केला होता. मात्र रोजगारात कुठलीही वाढ झाली नाही. नक्षलग्रस्त मागास जिल्ह्यात उद्योग येण्यासाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतूद नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांचा अपेक्षा भंग करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे गडचिरोली शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते यांनी व्यक्त केली आहे.