मलेरिया नियंत्रणासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:12 PM2018-07-18T23:12:53+5:302018-07-18T23:14:17+5:30

जंगलाचा प्रदेश असल्यामुळे डासजन्य आजारांसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी मलेरियाचा प्रकोप टाळण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यात हिवतापाचे रुग्ण कमी झाले असले तरी भामरागड तालुक्यात एक बालक दगावल्याने हा विभाग अधिक सतर्क झाला आहे.

Exercise for controlling malaria | मलेरिया नियंत्रणासाठी कसरत

मलेरिया नियंत्रणासाठी कसरत

Next
ठळक मुद्देसहा महिन्यांत ४३४ रुग्ण : गेल्यावर्षीपेक्षा स्थितीत सुधारणा, भामरागडात मात्र बालकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जंगलाचा प्रदेश असल्यामुळे डासजन्य आजारांसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी मलेरियाचा प्रकोप टाळण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यात हिवतापाचे रुग्ण कमी झाले असले तरी भामरागड तालुक्यात एक बालक दगावल्याने हा विभाग अधिक सतर्क झाला आहे.
गेल्यावर्षी जानेवारी ते जून २०१७ या दरम्यान २ लाख ३९ हजार ४०९ रुग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले. त्यापैकी १३३८ नमुन्यात मलेरिया आढळला. यावर्षी जानेवारी ते जून यादरम्यान २ लाख ३ हजार १७८ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी केवळ ४३४ जणांना मलेरिया आढळला.
पावसाळ्याला सुरूवात होताच डासांची उत्पत्ती वाढते. साचलेल्या पाण्यात डास अंडी टाकतात. नुकत्याच झालेल्या पावसानंतर ठिकठिकाणी डबकी साचली आहेत. या अस्वच्छ पाण्यात डेंग्युचा डास राहात नसला तरी हिवताप किंवा जपानी ज्वराच्या डासांची उत्पत्ती होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात डासनाशक औषधांची फवारणी केली जात आहे. पण अनेक लोक फवारणीलाही विरोध करतात.
हिवतापाचा प्रसार अ‍ॅनोफिलीस डासांच्या मादीमार्फत होतो. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नदी, नाले, पाण्याच्या टाक्या, कालवे इत्यादीमध्ये हिवताप प्रसारक अ‍ॅनोफिलीस डासाची मादी अंडे देते. त्यामुळे डासांची पैदास वाढते. डास चावल्यानंतर निरोगी मनुष्याच्या शरीरात हे जंतू यकृतामध्ये जातात व त्यांची वाढ होऊन १० ते १२ दिवसांनी हिवतापाची लक्षणे दिसून येतात. डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना झाकण बसवावे, असे हिवताप नियंत्रण विभागाने कळविले.
६६ हंगामी कर्मचाऱ्यांची भरती होणार
जिल्ह्यात मलेरियाचा प्रकोप झाल्यास पुरेसा औषधीसाठा उपलब्ध व्हावा म्हणून स्थानिक स्तरावरच औषधींची खरेदी आरोग्य प्रशासनाकडून केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत औषध खरेदीची निविदा प्रक्रिया झाली आहे.
जंगलालगतच्या गावांमध्ये डासांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्या गावांमध्ये डासनाशक फवारणी करण्यासाठी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ६६ कर्मचाºयांच्या भरतीला मंजुरी मिळाली असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील हिवतापाचे रुग्ण आढळणाऱ्या गावांमध्ये प्रति दोन माणसांमिळून एक मच्छरदाणी वाटण्यात आली आहे. यावर्षी ज्या भागात मलेरियाचा प्रकोप दिसेल त्या भागात मच्छरदाण्यांचे वाटप होणार असून त्यासाठी ४१ हजार ७३२ मच्छरदाण्यात तयार आहेत.
हिवतापाची लक्षणे आणि उपाय
थंडी वाजून ताप येणे, एक दिवसाआड ताप येणे, ताप आल्यानंतर घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे, उलट्या होणे आदी लक्षणे दिसून येतात. अशा लक्षणे दिसताच कोणतेही घरगुती इलाज न करता जवळच्या रुग्णालयात, आरोग्य केंद्रात घेऊन जावे.
हिवतापदुषित डासांनी चावल्यानंतर १० दिवस ते चार आठवड्यात हिवतापाची लक्षणे दिसून येतात. संसर्गानंतर लवकरात लवकर सात दिवसात व उशीरात उशिरा एक वर्षापर्यंत हिवतापाची लक्षणे आढळतात. काही जंतू आपल्या यकृतामध्ये सुप्तावस्थेत राहतात. पोषक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर लाल रक्तपेशींवर हल्ला करून आजाराची लागण होते.
झोपताना हातपाय झाकले जातील अशा पायघोळ कपड्यांचा वापर करावा. डास प्रतिबंधक क्रीम वापरावे. झोपताना मच्छरदानीचा वापर करणे हा सर्वाधिक चांगला उपाय आहे,
अधिकाऱ्यांना खटारा वाहन
जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकाऱ्यांना जिल्हाभर फिरण्यासाठी खटारा वाहन उपलब्ध आहे. चांगले वाहन मिळाल्यास अधिक चांगले काम होऊ शकेल असे ते सांगतात.

Web Title: Exercise for controlling malaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.