व्यायाम शाळा इमारत बनली शोभेची वास्तू
By Admin | Published: August 10, 2015 12:58 AM2015-08-10T00:58:38+5:302015-08-10T00:58:38+5:30
चामोर्शी तालुक्यातील तळोधी (मो.) येथील हौशी युवक मंडळाच्या मागणीनुसार व तळोधी ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर तत्कालीन आमदार अशोक नेते ...
खर्च व्यर्थ : १५ वर्षांपासून साहित्यच नाही
तळोधी (मो.) : चामोर्शी तालुक्यातील तळोधी (मो.) येथील हौशी युवक मंडळाच्या मागणीनुसार व तळोधी ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर तत्कालीन आमदार अशोक नेते यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून वार्ड क्रमांक ४ मधील रामपुरी टोली येथे २ लाख ४० हजार रूपयांचा निधी खर्च करून व्यायाम शाळेची इमारत उभारण्यात आली. मात्र सातत्याने मागणी करूनही शासन व प्रशासनाने या व्यायाम शाळेत साहित्य उपलब्ध करून दिले नाही. परिणामी लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेली व्यायाम शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून सदर इमारत केवळ शोभेची वास्तू बनली आहे.
रामपुरी टोली येथे व्यायाम शाळेची इमारत बांधल्यानंतर चार वर्षांनी या ठिकाणी भिंत उभारून जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या स्वतंत्र इमारतीच्या उभारणीसाठी शासनाकडून ६ लाख ७० हजार रूपयांचा निधी ग्रामपंचायतीला प्राप्त झाला. या निधीतून शाळा इमारत उभारण्यात आली. त्यानंतर व्यायाम शाळेतील जि.प. शाळा नव्या इमारतीत स्थानांतरित झाली. तेव्हापासून व्यायाम शाळेची सदर इमारत निकामी ठरली आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)
व्यायाम शाळा इमारतीची दुरवस्था
२ लाख ४० हजार रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या रामपुरी टोली येथील व्यायाम शाळा इमारतीचे दरवाजे चोरट्यांनी लंपास केले आहेत. खिडकीचे तावदाने तुटले आहेत. या इमारतीत नागरिक आपले साहित्य ठेवतात. माथेफिरू लोक या इमारतीत आश्रय घेतात. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे व्यायाम शाळा इमारतीची दुरवस्था झाली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन व्यायाम साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे.