विद्यमान सरकार लबाड व ढोंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:56 PM2018-02-26T23:56:11+5:302018-02-26T23:56:11+5:30
लबाड व ढोंगी शासनाचा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
आॅनलाईन लोकमत
देसाईगंज : लबाड व ढोंगी शासनाचा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. संविधान बचाव मोहिमेतून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण नव्याने सुरूवात करणार आहे. राज्यासह केंद्रातही काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी व काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सर्वांनी आपसातील मतभेद बाजूला सारून कामाला लागावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी केले.
राजीव गांधी कला, वाणिज्य महाविद्यालय व डॉ.साळवे नर्सिंग कॉलेज तथा तालुका काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य मेळावा तथा सत्कार समारंभात ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव रवींद्र दरेकर, महासचिव जिया पटेल, माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी नगराध्यक्ष जेसामल मोटवानी, प्रकाश ईटनकर, भावना वानखेडे, महेंद्र ब्राह्मणवाडे, अॅड.संजय गुरू, योगराज कुथे, ईश्वर कुमरे, सगुना तलांडी, डॉ.प्रमोद साळवे, नगरसेवक हरीश मोटवानी, परसराम टिकले, किशोर वनमाळी आदी प्रामुख्याने मंचावर विराजमान होते.
यावेळी पटोले म्हणाले, सत्तेत येण्यासाठी आश्वासनांच्या खैराती वाटून सर्वसामान्यांना बरबादीच्या उंबरठ्यावर उभे करणारे भाजप शासन म्हणजे लबाडाचे आवतन देणारे शासन आहे. शेतकरी शेतमजुरांना अनेक प्रलोभने दाखवून कोट्यवधी रुपये बँॅकात जमा करायला भाग पाडले. पण सत्तेत येताच काळा पैसा, प्रत्येकाला घर देण्याचे आश्वासन विसरून गेले. बहुजनांची मुले उच्चशिक्षित होऊ नयेत यासाठी शासकीय स्तरावरून देण्यात येणारी स्कॉलरशिपही बंद केल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून राज्य कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीत नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाट्यलेखनाचा पुरस्कार पटकावणारे किशोर मेश्राम यांना नाना पटोले यांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नर्सिंग कॉलेजच्या वतीने आरोग्य मेळाव्यात एकूण १३८ रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. संचालक नेहा तिवारी, प्रास्तविक डॉ. प्रमोद साळवे तर आभार प्रा.अविनाश शिवणकर यांनी मानले.