आशा व गटप्रवर्तकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:57 AM2018-04-22T00:57:59+5:302018-04-22T00:57:59+5:30
आशावर्कर व गटप्रवर्तकांना किमान १८ हजार वेतन लागू करून शासकीय सेवेत कायम करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांच्या वतीने शनिवारी जिल्हा परिषदेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आशावर्कर व गटप्रवर्तकांना किमान १८ हजार वेतन लागू करून शासकीय सेवेत कायम करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांच्या वतीने शनिवारी जिल्हा परिषदेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
२००५ पासून आशा व गटप्रवर्तकांची नेमणूक केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत केली. परंतु अत्यल्प मानधनावर त्यांच्याकडून अधिक काम करवून घेतले जात आहे. शासनस्तरावर अनेकदा पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनच कर्मचाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या गटप्रवर्तकांनी शनिवारी जिल्हा परिषदेसमोर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, भाकपचे महेश कोपुलवार, आयटकचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, रजनी गेडाम, गीता सातघरे, संगीता मेश्राम, चंदा लोखंडे, लता कन्नाके, विद्यादेवी येजूलवार, किरण गजभिये यांच्या नेतृत्त्वात निदर्शन केली.
येत्या १५ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास २१ मे पासून राज्यभर बेमुदत संप करण्यात येईल, असा इशारा आयटकच्या वतीने देण्यात आला.