रस्ते, नाली स्वच्छतेवर चार लाखांचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:34 PM2017-12-06T23:34:58+5:302017-12-06T23:35:18+5:30
आॅनलाईन लोकमत
वैरागड : येथील गावाअंतर्गत नाल्या, गटारे व गटग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मेंढेबोडी, पाटनवाडा येथील अनेक रस्ते व गटारांची साफसफाई झाली नसताना देखील अर्धवार्षिक जमा खर्चात रस्ते व गटार साफसफाई, गाळ फेकणे आदी कामांवर ग्रामपंचायतीने ४ लाख २६ हजार ८२२ रूपयांचा खर्च केला असल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र गावात स्वच्छतेचे कुठलेही काम झाले नाही. त्यामुळे रस्ते, गटार स्वच्छतेच्या कामात ग्रामपंचायतीने आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप नागरिकांनी मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत केला. तसेच या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत लावून धरली.
एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या कालावधीतील सर्व निधीचा जमा खर्च ५ डिसेंबरच्या ग्रामसभेत सादर करण्यात आला. या अर्धवार्षिक जमाखर्चात रस्ते, गटार, साफसफाईच्या कामावर १ लाख ५७ हजार ३२२ रूपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच नालीतील गाळ फेकण्याच्या कामावर २ लाख १९ हजार ५०० रूपये इतका खर्च दाखविण्यात आला आहे. त्यातही गाळ फेकणाºया ट्रॅक्टर मालकाचे पुन्हा ५० हजार रूपयांचे देयक अदा करणे शिल्लक असल्याचे ग्रामसभेत सांगण्यात आले. यावर गावकºयांनी तीव्र आक्षेप घेऊन वैरागड व गटग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया पाटनवाडा, मेंढेबोडी या गावातील अनेक नाल्या तुंबल्या असताना रस्ते व नाली सफाईवर सहा महिन्यात सव्वाचार लाखांचा खर्च कसा झाला, असा सवाल ग्रामस्थानी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना केला. सदर खर्च हा ग्रामसभेत नामंजूर करून या प्रकरणाची चौैकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी करण्यात आली.
एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या सहा महिन्यांत नाल्यातील गाळ उपसणे आणि तो ट्रॅक्टरद्वारे बाहेर फेकण्याच्या कामावर २ लाख ७० हजार रूपयांचा खर्च दाखविण्यात आला. गाळ फेकण्यासाठी एवढी मोठी रक्कम खर्च झाली तर हा गाळ नेमका कोठे फेकण्यात आला? याबाबत डम्पिंग ग्राऊंड नेमके कुठे आहे, ते दाखवा, असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. मात्र नागरिकांना या ग्रामसभेत एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. रस्ते व नाली सफाईच्या कामात प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाला असून याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. यावेळी वैरागड येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणी प्रश्नावर गदारोळ
वैरागडच्या ग्रामसभेत पाणी प्रश्नावर प्रचंड गदारोळ झाला. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून तीन ते चार दिवसाआड नळाला पाणी येतो, नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने काय उपाययोजना केली, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीच उपाययोजना केली नाही. नळाला टिल्लूपंप लावणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत नागरिकांनी सरपंच व उपसरपंचाला कोंडीत पकडले.
टीव्ही संच खरेदीच्या मुद्यावर चर्चा
शाळा डिजिटल करण्यासाठी शाळांना टीव्ही संच खरेदी न करण्याचे मासिक सभेत ठरले होते. मात्र ग्रा.पं. ने १ लाख २९ हजार रूपयांतून टीव्ही संच खरेदी करून शाळांना पुरविले. या मुद्यावरही चर्चा झाली.