खरगी गावात निघाली दारूची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:52 PM2018-09-24T22:52:31+5:302018-09-24T22:52:47+5:30
तालुक्यातील खरगी गावातील नागरिकांनी दारू विरोधात एल्गार पुकारत चक्क दारूची अंत्ययात्रा काढली. या दारूच्या तिरडीला गावच्या पोलीस पाटलांनी खांदा दिला. खरगीवासीयांच्या दारूबंदीच्या या अनोख्या उपक्रमाची तालुकाभरात चर्चा सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील खरगी गावातील नागरिकांनी दारू विरोधात एल्गार पुकारत चक्क दारूची अंत्ययात्रा काढली. या दारूच्या तिरडीला गावच्या पोलीस पाटलांनी खांदा दिला. खरगीवासीयांच्या दारूबंदीच्या या अनोख्या उपक्रमाची तालुकाभरात चर्चा सुरू आहे.
आदिवासी ‘सायबे मावा संस्कृती ते दांडगो मनवेके बताल कबाड आयो, दांडगो नावा संस्कृतीते मंता आदिनसाठी मावा नाटे दांडगो आयो पर्रो.’ दारू हा आदिवासींच्या संस्कृतीचा भाग आहे. दारूशिवाय माझ्या संस्कृतिक कोणतेच काम होत नाही. त्यामुळे माझ्या गावातील दारू बंद होऊ शकत नाही, असे वाक्य दारूबंदी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना, मुक्तीपथच्या पदाधिकाऱ्यांना ऐकायला मिळतात. मात्र दारूचे दुष्परिणाम लक्षात आलेल्या खरगी येथील आदिवासी नागरिकांनी गावात दारूबंदीचा ठराव घेतला. दारू ही आपल्या गावाला लागलेली कीड असून ही कीड भावी पिढीलाही लागण्याची शक्यता गावकºयांनी व्यक्त करून गावात दारूबंदीची अंमलबजावणी करण्याचा ठाम निर्णय घेतला. नागरिकांमध्ये दारूबंदीविषयी जनजागृती करण्यासाठी चक्क दारूचीच अंत्ययात्रा काढण्यात आली. तिरडीला गावचे पोलीस पाटील रामभाऊ नराटे, लोमेश नरोटे, काशिराम नरोटे, दयाराम टेकाम यांनी खांदा दिला. समोर डफरा वाजवत ‘दारूवरती हल्ला बोल’, ‘दारू बंद म्हणता’ अशा घोषणा देण्यात आल्या. या अंत्ययात्रेत गावातील आबालवृध्द सहभागी झाले होते. लोमेश नरोटे यांनी आदिवासी संस्कृतीत मोहाच्या दारूपेक्षा मोहाच्या झाडाला महत्त्व आहे. मोहाच्या झाडाची साल काढून जरी पाण्यात बुडविली आणि ती पाणी शिंपडले तरी आमचे देव प्रसन्न होतात. दारू पिण्यामुळे जुन्या पिढ्या उद्ध्वस्त झाल्या. नवीन पिढ्या उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी गावात दारूबंदी होणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन केले. सदर अंत्ययात्रा मुक्तीपथचे धानोरा संघटक सागर गोतपागर, प्रेरक भास्कर कड्यामी, अक्षय पेद्दिवार, रवी अलोणे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.