अतिक्रमण, उत्खनन, प्रदूषणातून नद्यांचे शोषण; जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 01:04 PM2023-06-21T13:04:56+5:302023-06-21T13:05:40+5:30
भांडवलदारांसाठी कार्पोरेट लोकशाही : नद्या वाचविण्यासाठी हवा लोकसहभाग
गडचिरोली : निसर्ग टिकवून ठेवण्याचे काम नद्यांनी केलेले आहे. नद्यांनी देश, राज्य व गावे जोडून ठेवली आहेत. मात्र, वाढते अतिक्रमण, उत्खनन व प्रदूषण यामुळे नद्यांचे अक्षरश: शोषण सुरू असल्याची खंत रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली. लोकसहभागासह सरकारने पुढाकार घेऊन नद्या वाचविल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात १३ जूनपासून ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबविण्यात आला. २१ जून रोजी या उपक्रमाचा समारोप आहे. यासाठी २० जून रोजी जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह हे शहरात आले आहेत. दुपारी शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा, चला जाणूया नदीला मोहिमेच्या राज्य समितीचे सदस्य रमाकांत कुलकर्णी, नरेंद्र चुग, प्रवीण महाजन, सुमंत पांडे, संदीप रहाणे, डॉ. सतीश गोगुलवार, नदीप्रहरी मनोहर हेपट, राहुल गुडघाणे, केशव गुरनुले, प्रकाश अर्जुनवार उपस्थित होते.
या मोहिमेंतर्गत राज्यात ७५ नद्यांची निवड केली होती. गडचिरोलीतून कठाणी नदीचा समावेश होता. धानोरा तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील पिटेमेडा येथून या नदीला उगम होतो. ७० किलोमीटर अंतराची ही नदी गडचिरोलीतील वैनगंगा नदीला मिळते. दरम्यान, अशा प्रकारे राज्यात सर्वत्र नदी संवाद यात्रा घेण्यात आली. यात कमी- अधिक प्रमाणात सर्वत्रच अतिक्रमण, उत्खनन व प्रदूषण हे तीन महत्त्वाचे प्रश्न समोर आले असल्याचे डॉ. राजेंद्रसिंह यांनी सांगितले.
चळवळ उभी राहतेय...
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने नद्यांसाठी एखादी मोहीम हाती घेतली आहे. यास स्थानिक नागरिकांनीही प्रतिसाद दिला. नद्यांत साेडले जाणारे घाण पाणी, त्यामुळे होणारे प्रदूषण, रेती उपशातून नद्यांतील खनिजाची लूट याविरोधात लोक उभे राहत आहेत. ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली जाईल, सरकार व प्रशासन त्यावर तोडगा काढेल, असा विश्वास जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केला.