कुकरमध्ये पुरुन ठेवली होती स्फोटके, नक्षल्यांचा घातपाताचा मोठा डाव

By संजय तिपाले | Published: February 19, 2024 07:48 PM2024-02-19T19:48:45+5:302024-02-19T19:49:05+5:30

बीडीडीएस पथकाची कारवाई: कोटगुल पहाडीजवळ दोन किलो स्फोटक केली नष्ट.

Explosives were buried in the cooker a big assassination attempt by the Naxals | कुकरमध्ये पुरुन ठेवली होती स्फोटके, नक्षल्यांचा घातपाताचा मोठा डाव

कुकरमध्ये पुरुन ठेवली होती स्फोटके, नक्षल्यांचा घातपाताचा मोठा डाव

गडचिरोली: पोलिसांविरुध्द घातपाती कारवायांचा नक्षल्यांचा मोठा डाव हाणून पाडण्यात पोलिस दलाच्या बीडीडीएसला (बॉम्ब शोधक व नाशक पथक)  १९ फेब्रुवारी रोजी यश आले. प्रेशर कुकरमध्ये दोन किलो घातक स्फोटके टाकून ते जमिनीत पुरुन ठेवले होते. कुरखेडा तालुक्यातील कोटगुल पहाडीजवळ हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी स्फोटके जागीच नष्ट केली.
 
 मार्च ते मे महिन्यादरम्यान तब्बल तीन महिने नक्षलवाद्यांकडून पोलिसांना नुकसान पोहोचविण्यासाठी  'टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन' (टीसीओसी) अभियान राबविले जाते. या पार्श्वभूमीवर ही स्फोटके पोलिसांचा घातपात करण्यासाठी जमिनी दडवून ठेवल्याचा अंदाज आहे.  १९ फेब्रुवारी रोजी  कुरखेडा तालुक्यातील कोटगुलपासून ५०० मीटर अंतरावरील पहाडीच्या पायथ्याजवळ गोंडरी जंगल परिसराकडे जाणा­ऱ्या पायवाटेवर माओवाद्यांनी पोलिस पथकांना नुकसान पोहोचविण्यासाठी    स्फोटके व इतर साहित्य पुरुन ठेवल्याची अशी गोपनिय माहिती कोटगुलचे प्रभारी अधिकारी धनंजय कुलकर्णी यांना मिळाली होती. त्यांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (बीडीडीएस) पाचारण करुन जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. यावेळी अत्याधुनिक उपकरणाद्वारे तपासणी केली असता जमिनीत दीड ते दोन फूट खोदून प्रेशर कुकरमध्ये दोन किलो घातक स्फोटके पेरुन ठेवली होती, असे समोर आले. ही स्फोटके सुरक्षितरीत्या जागीच नष्ट करण्यात आली.

पोलीस अधीक्षक  नीलोत्पल , अपर अधीक्षक  यतीश देशमुख  ,  एम. रमेश  , उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली    उपनिरीक्षकधनंजय कुलकर्णी, बीडीडीएस पथक प्रभारी अधिकारी मयूर पवार, हवालदार पंकज हुलके,   अनंत  सोयाम, अंमलदार सचिन लांजेवार , तिम्मा गुरनुले यांनी ही कारवाई केली.
 
कोटगुल परिसरात भूसुरुंगाबाबत वेळीच माहिती मिळाल्याने नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावण्यात यश आले. 
  माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात येईल.  माओवादाची हिंसक वाट सोडून त्यांनी सन्मानाने जीवन जगणेच हिताचे आहे.
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली
 

Web Title: Explosives were buried in the cooker a big assassination attempt by the Naxals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.