प्रचलित पाणी पुरवठ्यात दोष
By admin | Published: May 15, 2016 01:08 AM2016-05-15T01:08:09+5:302016-05-15T01:08:09+5:30
जिल्ह्यात १४०० ते १५०० मिमी पाऊस दरवर्षी सरासरीने पडतो. परंतु या पावसाचे पाणी कुठेही साठवून ठेवता येत नाही.
दुरूस्तीसाठी निधी नाही : अनेक ग्राम पंचायतीच्या पाणीपुरवठा योजना झाल्या निकामी
गडचिरोली : जिल्ह्यात १४०० ते १५०० मिमी पाऊस दरवर्षी सरासरीने पडतो. परंतु या पावसाचे पाणी कुठेही साठवून ठेवता येत नाही. वनकायद्यामुळे या जिल्ह्यात सिंचन प्रकल्प नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. नद्यांवर पाणी पुरवठा योजना अवलंबून असून यावर असलेल्या पाणी वितरण पद्धतीतही मोठ्या प्रमाणावर दोष निर्माण झाले आहेत. हे दोष दूर करून सुदृढ पाणी वितरण प्रणाली निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी सरकारी यंत्रणेनेही पुढाकार घेण्याची गरज आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १० मोठ्या नद्या आहेत. यामध्ये गोदावरी, इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा, वैनगंगा, कठाणी, खोब्रागडी, गाढवी, सती आदी नद्यांचा समावेश आहे. या नद्यांवर अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. गडचिरोली जिल्ह्यात नदीच्या काठावर विहीरस्वरुपाची टाकी तयार करून त्याचे पाणी फिल्टर प्लॉटमध्ये आणल्या जाते व तेथून त्याचे वितरण पाईपलाईनद्वारे करण्यात येते. यातील मोठ्या गावांमध्ये फिल्टर प्लाँटची व्यवस्था आहे. पाणी वितरणाची ही पद्धत जिल्ह्यात सर्वत्र आहे. या वितरण व्यवस्थेसाठी वापरण्यात आलेल्या पाईप हे बिडाचे असून अनेक पाणी पुरवठा योजनेची वितरण व्यवस्था ही २५ ते ३० वर्षाची जुनी आहे. त्यामुळे या वितरण व्यवस्थेसाठी असलेले पाईप अनेक ठिकाणी फुटलेले व छिद्र पडलेले आहेत.
अनेक ठिकाणी पाईपला आतून भागात खराब झालेले आहेत. जमिनीत राहून जंगही त्यावर चढलेला आहे. या जुन्या वितरण प्रणालीची आता नव्याने पुनर्बांधणी करण्याची नितांत गरज आहे. परंतु यासाठी ग्रामपंचायती, नगर पालिका यांच्याकडे आर्थिक तरतुद नाही. त्यामुळे जुन्याच पाईप लाईनच्या भरवशावर वितरण व्यवस्था चालविली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी ही जुनी पाईपलाईन वारंवार फुटून दूषित पाण्याची समस्याही निर्माण होते.
वितरण व्यवस्थेसाठी वापरण्यात येणारी पाणी टाकी वर्षातून एक ते दोनच वेळा साफ केली जाते. काही ठिकाणी ही साफही केल्या जात नाही. शहराचे नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्याने आता काही ठिकाणी वॉर्डातील बोअरवेलवर मोटार बसवून जुन्या पाईपलाईनला सदर नवीन विस्तारित कनेक्शन जोडण्याचे काम अनेक ठिकाणी केले जाते. त्यामुळे अशा वितरण प्रणालीत पाण्याच्या शुद्धतेचे महत्त्व गौण ठरत आहे. या संपूर्ण व्यवस्थेत नवीन बदल आवश्यक असून ज्या गावातील पाणी पुरवठा योजना जुन्या झाल्या आहेत. त्या नवीन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा व निधी देण्याची गरज आहे. तसेच सार्वजनिक नळ याच्यावरही नियंत्रण ठेऊन त्यातही दुरूस्ती करण्याची गरज आहे. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये हातपंपाचे पाणीही वापरतात. ही या भागातील प्रचलित पाणी वितरण प्रणाली आहे. यातील अनेक हातपंपाचे पाणी पिण्यास योग्य नाही. तरीही त्याचा वापर पिण्यासाठी पाणी म्हणून केला जातो. काही गावात सार्वजनिक विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. दुर्गम गावांमध्ये झरे व नाले यांचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो. काही गावांमध्ये नदीवरून माचाद्वारे पाणी आणून त्याचाही वापर केला जातो. या सर्व प्रचलित पाणी वितरण पद्धती असल्या तरी आता पाण्यासाठी येवढा वेळ खर्च करणे सर्वसामान्य माणसाला परवडत नसल्याने या संपूर्ण व्यवस्थेचा पुनर्आढावा घेऊन बोअरवेल मोटार बसवून दुहेरी पंप योजना गडचिरोली जिल्ह्यात सौरऊर्जेच्या भरवशावर निर्माण केली जात आहे. तसेच काही विहिरींवर मोटारी बसवून त्याचे पाणी पाईपलाईनद्वारे गावात पुरवठा केले. (जिल्हा प्रतिनिधी)