पोलीस अधीक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:54 AM2018-04-11T00:54:33+5:302018-04-11T00:54:33+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना मंगळवारी सायंकाळी मुंबईत झालेल्या शानदार कार्यक्रमात कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना मंगळवारी सायंकाळी मुंबईत झालेल्या शानदार कार्यक्रमात कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचे वृत्त गडचिरोलीत धडकताच त्यांच्यावर सोशल मीडियातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.
डॉ.देशमुख विशेष प्रशिक्षणासाठी दक्षिण कोरियात असल्यामुळे त्यांच्या वतीने डॉ.सोनाली देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला. गेल्या दोन वर्षांपासून गडचिरोलीत कार्यरत असताना डॉ.देशमुख यांनी नक्षल कारवाया नियंत्रित आणण्यासोबतच नक्षलग्रस्त नागरिकांची पोलिसांशी जवळीक वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले. त्यामुळे आयपीएस कॅटेगरीमधून या पुरस्कारासाठी त्यांना भरभरून मते मिळाली. एवढेच नाही तर त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेतल्यानंतर निवड समितीमधील सदस्यांनी त्यांना या पुरस्कारासाठी अधिक योग्य समजले. मात्र पुरस्कार नेमका कुणाला मिळणार याची उत्सुकता प्रत्यक्ष समारंभात पुरस्कार जाहीर होईपर्यंत कायम होती.
डॉ.अभिनव देशमुख यांचे नाव पुरस्कारासाठी जाहीर झाल्याचे समजताच गडचिरोलीत विविध क्षेत्रातील नागरिकांनी सोशल मीडियावरून त्यांचे अभिनंदन केले. हा पुरस्कार गडचिरोलीवासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक असलेले संदीप पाटील यांनाही सदर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता पुन्हा हा सन्मान गडचिरोली जिल्ह्याला मिळाल्याने जिल्हा पोलीस दलातही मोठा आनंद व्यक्त होत आहे.