आवास योजनेचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:12 PM2019-03-04T22:12:50+5:302019-03-04T22:14:11+5:30
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. यापैकी निवारा ही महत्त्वाची गरज असून नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. मात्र अद्यापही समाजातील अनेक दुर्लक्षित घटकांना हक्काचा निवारा मिळाला नाही. त्यामुळे अनेकांना आजही उघड्यावर संसार मांडण्याची पाळी येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. यापैकी निवारा ही महत्त्वाची गरज असून नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. मात्र अद्यापही समाजातील अनेक दुर्लक्षित घटकांना हक्काचा निवारा मिळाला नाही. त्यामुळे अनेकांना आजही उघड्यावर संसार मांडण्याची पाळी येते. अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी पंतप्रधान आवास योजना अंमलात आणण्यात आली. या योजनेचा लाभ प्रत्येक गरजुंपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी उपस्थित कर्मचारी अधिकाऱ्यांना केले.
देसाईगंज येथील पंचायत समितीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात शनिवारी आयोजित प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व इतर राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाºयांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पठारे, देसाईगंज पंचायत समितीचे सभापती मोहन गायकवाड, उपसभापती गोपाल उईके, आरमोरी पंचायत समितीच्या सभापती बबिता उसेंडी, उपसभापती यशवंत सुरपाम, आरमोरीचे गटविकास अधिकारी कोमलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना राठोड म्हणाले, समाजात अद्यापही असे घटक आहेत ज्यांची आजमितीसही सामाजिक आर्थिक प्रगती झाली नाही. अशांचा शोध घेऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व वंचित मानवाच्या मुलभूत गरज पूर्ण करता यावी यास्तव समाजातील अशा वंचित घटकांची सामाजिक, आर्थिक जात गणनेच्या आधारावर त्यांना घरकुलाचा लाभ दिला जातो. योजनांचा लाभ पोहोचविणे हे आपले कर्तव्य समजुन संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कर्तव्य पार पाडावे, एकही गरजू घटक आवास योजनेपासून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
घरकुलांच्या या उद्दिष्टपूर्तीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राठोड यांच्या हस्ते ग्रामसेवक व कर्मचाºयांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि ग्रामीण गृह निर्माण अभियंत्यांचाही प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक देसाईगंज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम यांनी केले तर संचालन व आभार पंचायत विस्तार अधिकारी उमेश्चंद्र चिलबुले यांनी मानले. कार्यक्रमाला देसाईगंज पंचायत समिती व आरमोरी पंचायत समितीचे सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
८० टक्क्यांवर घरकुलांचे काम
तालुक्याच्या ग्रामीण पातळीवर ग्रामसेवक या घटकाने परिश्रम घेऊन देसाईगंज तालुक्यात ४४८ पैकी ३७६ घरकुलांचे काम पूर्ण केले. देसाईगंज तालुक्यात एकूण उद्दिष्टांपैकी ८३.९६ टक्के तर आरमोरी तालुक्यात ७२५ पैकी ५९९ घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले. येथे ८२.६५ टक्के काम झाले आहे.