पाच टक्के निधीसाठीच्या दिव्यांग नोंदणीला मुदतवाढ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:47 AM2021-02-05T08:47:49+5:302021-02-05T08:47:49+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : पाच टक्के निधीचा लाभ मिळण्यासाठी सुरू असलेल्या दिव्यांग नाेंदणीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : पाच टक्के निधीचा लाभ मिळण्यासाठी सुरू असलेल्या दिव्यांग नाेंदणीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह दिव्यांग बांधवांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष पवन नारनवरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या उत्पन्नातून दिव्यांग लोकांना एकूण जमा होणाऱ्या रकमेच्या पाच टक्के निधी हा स्थानिक दिव्यांग लोकांवर खर्च करण्याबाबत शासननिर्णय आहे. त्यासाठी दिव्यांग नोंदणीचा कार्यक्रम नगरपरिषदेमार्फत घोषित करण्यात आला. परंतु त्याची माहिती आरमोरी नगरपरिषद मधील बहुतांश दिव्यांग रहिवासी लोकांना मुदत उलटूनही मिळाली नाही. त्यामुळे आपल्याला नोंदणीपासून वंचित राहावे लागून योजनेचा लाभ घेता येणार नाही, अशी कैफियत दिव्यांग बांधवांनी आरमोरी प्रहार संघटना यांच्यासमोर मांडली.
तेव्हा तत्काळ प्रहार संघटना आरमोरीचे कार्यकर्ते व काही दिव्यांग बांधव यांनी नगरपरिषद येथे जाऊन नगराध्यक्ष पवन नारनवरे यांची भेट घेतली. एकही दिव्यांग बांधव शासनाच्या योजनेपासून वंचित राहता कामा नये, याची परिपूर्णपणे जाणीव नगराध्यक्ष नारनवरे यांना करून देण्यात आली. तसेच नोंदणीसाठी येणाऱ्या ऑनलाईन प्रमाणपत्राच्या अडचणी तसेच इतर बाबतही सकारात्मक चर्चा करून दिव्यांग नोंदणीची तारीख वाढवून देऊन दिव्यांग बांधवांच्या माहितीसाठी नगरपरिषदेद्वारे जनतेपर्यंत दिव्यांग योजनांची माहिती पोहाेचवावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना प्रहारचे निखिल धार्मिक, केवळ दुमाणे, गुरुदेव वाटगुरे, प्रहार दिव्यांग संघटनेचे अनंत भोयर, विनोद निमजे तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते.