विकासकामांची माहिती पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:45 PM2018-07-02T22:45:16+5:302018-07-02T22:45:32+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. विकासकामांची गती वाढविली. तसेच राज्य सरकारनेही महाराष्ट्रात चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची व केलेल्या विकासकामांची माहिती घराघरात पोहोचवावी, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी कार्यकर्त्यांना केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. विकासकामांची गती वाढविली. तसेच राज्य सरकारनेही महाराष्ट्रात चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची व केलेल्या विकासकामांची माहिती घराघरात पोहोचवावी, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी कार्यकर्त्यांना केले.
स्थानिक इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात भाजप पक्षाची बैठक रविवारी पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने भाजपचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख बाबुराव कोहळे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष दामोधर अरीगेला, डॉ. भारत खटी, महामंत्री श्रीकृष्ण कावनपुरे, बंडू झाडे, भांडेकर, समर्थ, जनार्धन साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी खा. अशोक नेते यांनी गडचिरोली तालुक्यातील भाजप पक्ष संघटनेचा प्रमुखांकडून आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, प्रशासनाच्या वतीने सध्या नवीन मतदार नोंदणी सुरू आहे. मतदार यादीत नाव असलेल्या अनेक मतदारांची नावे यादीत समाविष्ट होण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी संबंधित नागरिकांना सहकार्य करावे. नावाची नोंद होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून मतदारांच्या संख्येमध्ये वाढ होईल, असे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला चार वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी जनधन विमा योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान व इतर अनेक योजना राबविण्यात आल्या. स्वच्छ भारत अभियानातून संपूर्ण भारतात ७.५ कोटी इतक्या शौचालयाचे बांधकाम केले. उज्वला योजनेमुळे ३.८ कोटी कुटुंब धूरमुक्त झाली, असे खा. अशोक नेते यांनी सांगितले.
कार्यकर्ता महत्त्वाचा दुवा
आगामी लोकसभेची निवडणूक लक्षात घेता भाजपने सक्ती केंद्र प्रमुख, मंडळ प्रमुख, पालक व बुथ प्रमुख या सर्वांवर जबाबदारी टाकली आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा महत्त्वाचा दुवा असल्याने कार्यकर्त्यांनी बुथावर लक्ष केंद्रीत करून त्याअनुषंगाने पक्ष संघटनेचे काम केले पाहिजे, असे आवाहन बाबुराव कोहळे यांनी या बैठकीत भाषणातून केले.